टाळाटाळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करणार

ठाणे : खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे काटकसरीचा संकल्प सोडणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी देयकांची कोटय़वधींची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने मोहीम आखली आहे. मालमत्ता कराची ५० हजारांहून अधिक थकबाकी असणाऱ्या ६२४८ थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी पालिकेची पथके त्यांच्या घरी धडक देणार आहेत, तसेच कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी करोना संकटामुळे महापालिकेला जुलै महिनाअखेपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली करणे शक्य झाले नव्हते. त्यानंतर मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीवर प्रशासनाने भर दिला होता. त्यामुळे आतापर्यंत मालमत्ता कराची ४९३ कोटींची तर पाणी देयकांची ११५ कोटींची वसुली झाली आहे. करोनाकाळात नवीन बांधकामांचे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत. यामुळे शहर विकास विभाग आणि अग्निशमन विभागाला विविध करांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती काहीशी नाजूक असल्याने मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून उत्पन्नवाढीचा पालिकेचा प्रयत्न आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ५० हजारांपेक्षा जास्त रकमेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांची प्रशासनाने यादी तयार केली आहे. त्यामध्ये ३२५७ रहिवासी मालमत्ता असून त्यांच्याकडे ६७.६६ कोटींचा कर थकीत आहे. तर, २९९१ व्यावसायिक मालमत्ता असून त्यांच्याकडे ७७ कोटींचा कर थकीत आहे. अशा प्रकारे ६२४८ थकबाकीदारांकडून १४४ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात येणार आहे.

फिरत्या करसंकलनाला चांगला प्रतिसाद

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच कर भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने वाहनाद्वारे करसंकलनाची सुविधा सुरू केली आहे. या वाहनाच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून शहरातील गृहसंकुले तसेच विविध परिसरांत जाऊन कराची वसुली केली जात आहे. या वाहनाद्वारे कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे आतापर्यंत १३४४ नागरिकांकडून ११९.६७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

मालमत्ता कर आणि पाणी देयकाची थकीत वसुली करण्याचे काम पथकाकडून सुरू आहे. थकबाकीदारांनी कराचा भारणा करून कारवाई टाळावी. तसेच जे कर भरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका