ठाणे : ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेनेने कोटय़वधी रुपयांचे वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेविनाच गोंधळात मंजूर केले.

ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधरण सभेपुढे प्रशासनाने विविध विकास कामांचे ४८ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. त्यामध्ये ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे यंत्र आणि द्रव्यरूप साबण खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. अशाच स्वरूपाचा प्रस्ताव प्रशासनाने यापूर्वी मंजुरीसाठी आणला होता. त्यावेळेस नगरसेवकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे प्रशासनाने नव्याने प्रस्ताव सादर करून तो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याचा दावा केला होता. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी या प्रस्तावासंदर्भात काही प्रश्न सभागृहात उपस्थित केले.

शाळांमध्ये पाण्याची समस्या असून या यंत्राचा वापर कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर हात धुण्यासाठी पाण्याची गरज लागणार नाही, असा दावा प्रशासनाने केला. या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच सभागृहात गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळातच सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. विषयपत्रिकेवरील सर्वच प्रस्ताव शिवसेनेने गोंधळात मंजूर केले. त्यामध्ये यापूर्वी नगरसेवकांनी तहकूब ठेवलेले आरएफआयडी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टेबल ते टेबल ट्रॅक करणे, विकासकामांची देखरेख व तपासणीसाठी मोबाइल अ‍ॅप आणि थ्रीडी नकाशासह जीआयएस प्रणालीवर आधारित प्लॅटफार्म उभारून त्याचे व्यवस्थापन करणे अशा प्रस्तावाचा समावेश आहे.

या प्रस्तावांवर विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चर्चा करायची होती, मात्र चर्चेविनाच मंजूर केल्याने विरोधक विरोध नोंदवून सभागृहाबाहेर पडले.

प्रस्ताव ‘गोंधळ’

सत्ताधारी शिवसेनेने गोंधळात प्रस्ताव मंजूर केले खरे, पण याच मुद्दय़ावरून शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये या आक्रमक झाल्या.

गोंधळात प्रस्ताव मंजूर करता आणि आम्हा नगरसेवकांना प्रस्तावांवर तुम्ही बोलूच देत नाही, अशी स्वपक्षीय नेत्यांवर टीका केली.

तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांना सांगितले तरी चालेल, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.