क्रीडासंकुल उभारणी
ठाण्यातील मनोरुग्णालयाजवळील एसीसी कंपनीच्या सुविधा भूखंडावर तळ अधिक दोन मजल्याचे मिनी क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या कामाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

घोडबंदर मार्गावर पाच पादचारी पूल
घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन डोंगरीपाडा, मुच्छला पॉलटेक्निकल, ओवळा, भाईंदरपाडा, गायमुख घाट या पाच ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. या पुलाचे काम जाहिरातीचे हक्क देऊन बीओटी तत्त्वावर करण्याचे नियोजन महापालिकेने आखले आहे. या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही तर महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी ३३.२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी १५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

बाळकुम तरण तलाव..
बाळकुम येथील ध्रुव वूलन मिल कंपनीच्या जागेतील सुविधा भुखंडावर ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभारण्यात येणार असून त्यास सर्वसाधारण सभेचीही मान्यता मिळाली आहे. ठाणे शहरातील हा सर्वात अद्ययावत असा तलाव, असा दावा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुढील दोन वर्षांत तरण तलावाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने आखले आहे.

वाहनतळ सुविधा
ठाणे शहरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी वाहनतळे उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. या पाश्र्वभू्मीवर महापालिकेने शहरात वाहनतळ उभारण्यासाठी नियोजन आखण्यास सुरुवात केली असून त्यानुसार कापुरबावडी येथील ज्युपिटर रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या १३५७.२३ चौरस मीटरच्या सुविधा भूखंडावर २५०० चारचाकी वाहन क्षमतेचे वाहनतळ विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सेवा रस्त्यांवरील वाहने उभी करण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

एकात्मिक तलावांचे सौंदर्यीकरण
ठाणे शहरात सुमारे ३५ तलाव असून त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यापैकी कळवा येथील शिवाजीनगर, कोपरी येथील हरिओमनगर या दोन तलावांची कामे पूर्ण झाली आहेत तर ब्रह्माळा व कचराळी तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे मासुंदा, जेल आणि उपवन तलावांचे संवर्धन करण्याचेही प्रस्तावित आहे. ही सर्व कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

बाळकुम भागात सेंट्रल पार्क
बाळकुम-कोळशेत परिसरातील बायर इंडिया कंपनीच्या सुविधा भूखंडापैकी ३० एकर क्षेत्रफळावर ‘सेंट्रल पार्क’ विकसित करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील उद्यानांच्या तुलनेत सेंट्रल पार्क हे सर्वात मोठे उद्यान असणार आहे. या उद्यानात तिथे असलेल्या झाडांचे संवर्धन, नवीन स्थानिक झाडांच्या प्रजातीची लागवड व संवर्धन, वाहनतळ व्यवस्था, नेचर ट्रेल, जॉगिंग ट्रक, तलावनिर्मिती, स्केट पार्क, ओपन जिम, गार्डन, पॅव्हेलियन अ‍ॅम्पी थिएटर, नेचर एज्युकेशन, मैदानी खेळासाठी मोकळी जागा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरामध्ये ८२७८ चौ.मी. क्षेत्रावर फाऊंटन पार्क विकसित करण्यात येणार असून त्यात जगप्रसिद्ध कारंज्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येतील.

परिवहन बस खरेदी
ठाणे परिवहन प्रशासनाने २३० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेसाठी २०० बसेससाठी निधी मिळाला आहे. यामुळे उर्वरित ३० बस खरेदी करण्यासाठी महापालिकेने ३८.४३ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.

विजेवर चालणारी वाहने, सायकलींच्या मार्गिका
ठाणे शहरातील अनेक भाग अतिशय वर्दळीचे आहेत. त्यापैकी एक असलेल्या पोखरण रोड क्रमांक १, उपवन, पोखरण रोड क्रमांक २, वसंतविहार, पवारनगर व टिकूजिनीवाडी रोडवर ‘सॉफ्ट मोबिलिटी’ वाहतूक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय पोखरण रोड क्रमांक २ येथे सायकलस्वारांसाठी स्वतंत्र्य मार्गिका आखली जाणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेत यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

वर्तकनगर भागात मिनी मॉल
वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक -१ च्या रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या व्यावसायिक गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मिनी मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. म्हाडाने वर्तकनगर नाक्यावरील भूखंड महापालिकेला दिला असून या भूखंडावर हा मॉल उभारण्यात येणार आहे. याशिवाय, मॉलमध्ये सुमारे अडीचशे दुचाकी क्षमतेचे वाहनतळही मॉलमध्ये तयार करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहणार आहे. खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही तर महापालिका स्वत:चा निधी खर्च करणार आहे. या मॉलच्या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट (जेटी सुविधा)
ठाणे शहरात वाहनांची संख्या वाढू लागली असून त्या तुलनेत मात्र रस्ते अपुरे पडू लागले आहेत. परिणामी, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तसेच ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये दळणवळणासाठी असलेल्या रेल्वे सेवेवरही वाढत्या लोकसंख्येमुळे ताण येऊ लागला असून या प्रवासादरम्यान अनेकांना गर्दीमुळे प्राण गमावावे लागत आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे शहराला लाभलेल्या ३२ किमी खाडी परिसरात शहरांतर्गत जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजनही आहे. यासाठी खाडी परिसरातील कोलशेत, कोपरी आणि पारसिक रेतीबंदर या भागात पहिल्या टप्प्यात जेटी निर्माण करण्याचा विचार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा किंवा खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही तर महापालिका स्वत:चा निधी खर्च करणार असून त्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

व्यावसायिक दुकाने खरेदी
ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली असून यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेली बांधकामे बाधित होत आहे. या बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्त्वावरील योजनेमधील वाणिज्य गाळे खरेदी करून ते रस्ते रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या विस्थापितांना देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधा टाटा कॅन्सर रुग्णालय
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. कर्करोगासारख्या आजारावर उपचार करण्यासाठी ठाणेकरांना मुंबई परिसरात जावे लागते. यामुळे महापालिकेने कोलशेत भागातील भूखंड टाटा कॅन्सर रुग्णालयासाठी नाममात्र दराने देण्याचे ठरविले आहे. या भूखंडावर टाटा मेमोरियल ट्रस्टतर्फे टाटा कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

संकरा नेत्रालय
ठाण्यातील कोलशेत भागातील ८४०० चौ.मी. जागेवर नेत्रालय व संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून ते संकरा नेत्रालय या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

ज्येष्ठांचे नंदनवन (वृद्धाश्रम)
वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक २ वरील व्होल्टास कंपनीच्या १२०० चौ.मी. सुविधा भूखंडावर ज्येष्ठांचे नंदनवन उभारण्यात येणार आहे. सर्व सोयीसुविधांयुक्त अशा प्रकारचे हे वृद्धाश्रम असणार आहे.

मेडिटेशन व होलिस्टिक सेंटर
ठाणे शहरात मेडिटेशन सेंटरची सोय नसल्यामुळे अनेक ठाणेकर या सेवेसाठी अन्य शहरांमध्ये जातात. यामुळे ठाणेकरांना शहरामध्येच ही सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने मेडिटेशन व होलिस्टिक सेंटर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. घोडबंदर रोड येथील विजय विलास गृहनिर्माण प्रकल्पातून प्राप्त १५.२० चौ.मी. क्षेत्राच्या सुविधा भूखंडावर होलिस्टिक सेंटर विकसित करण्यात येणार आहे.

खाडीकिनारी परिसराचे सुशोभीकरण

ठाणे शहरातील सिडको बस स्टॉप ते साकेतपर्यंतच्या खाडीकिनारी परिसराचे सुशोभीकरण व संवर्धन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या भागाचा विकास करण्यात आला असून उर्वरित भागाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा किंवा खासगी लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

कम्युनिटी पार्क
वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक-२ वरील आर.पी.जी केबल कंपनीच्या भूखंडापैकी ८००० चौ. मी क्षेत्रफळावर कम्युनिटी पार्क उभारण्यात येणार आहे. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून हे उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यात सर्वासाठी मनोरंजनात्मक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.