ठाणे पालिकेचा सावळागोंधळ कायम; भाजी विक्रेत्यांना लागण झाल्यानंतर घोडबंदर परिसर पुन्हा बंद

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीतील नियमांची अंमलबजावणी करताना पालिकेच्या पातळीवर सावळागोंधळ अजूनही कायम आहे. संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ातील अनेक आघाडय़ांवर ठाणे महापालिका प्रशासन धास्तावल्याचे चित्र आहे. कापूरबावडी भागात तीन भाजी विक्रेत्यांना करोनाची लागण झाल्याच्या घटनेनंतर कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा संपूर्ण घोडबंदर परिसर अवघ्या २४ तासांच्या सवलतीनंतर गुरुवारपासून पुन्हा पूर्ण बंद करण्याचा अजब निर्णय आयुक्त विजय सिंघल यांनी बुधवारी सकाळी घेतला.

सलग चार दिवस घोडबंदर परिसरात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी येथील टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने लोकांनी भाजी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर भागातील भाजी विक्रेते त्या भागात कडक टाळेबंदी असल्याने घोडबंदर येथे येऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. हातावर पोट असलेले अनेक विक्रेते शहरातील ज्या भागात टाळेबंदी नाही तेथे जाऊन व्यवसाय करताना दिसत आहेत. असे असताना कापूरबावडी येथे भाजी विक्री करणाऱ्या तिघांना करोनाची लागण झाल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट झाले. हे तिघेही विक्रेते वागळे इस्टेट परिसरात वास्तव्यास आहेत. या तिघांना लागण होताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने कापूरबावडी परिसरात बुधवारी सकाळपासून जोरदार रुग्णशोध मोहीम सुरू केली. या भागातील अन्य काही भाजी विक्रेत्यांनाही लागण होऊ शकते, या भीतीने काहींचे  विलगीकरणही करण्यात आले.

‘संसर्गाचा वेग वाढण्याची भीती’

घोडबंदरची टाळेबंदी उठवून २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच गुरुवारपासून कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या संपूर्ण परिसरात कठोर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ढोकाळी परिसरातील हायलॅण्ड हेवन आणि रुनवाल पर्ल या दोन इमारतींमध्येही करोना रुग्ण सापडले. त्यामुळे सकाळीच हा परिसर बंद करण्यात आला. दरम्यान, भाजी विक्रेत्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण टाळेबंदीशिवाय पर्याय नाही, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ईदचा सण जवळ येत असल्याने २४ तासांपूर्वी या भागातील टाळेबंदी उठविण्यात आली होती. कासारवडवली या पट्टय़ात मुस्लीम बांधवांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येत्या २६ तारखेपर्यंत टाळेबंदीचे नियम या ठिकाणी शिथिल करण्यात आले होते. मात्र, भाजी विक्रेत्यांमुळे हा संसर्ग वेगाने होऊ शकतो, म्हणून ही टाळेबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

घरपोच व्यवस्था सुरू

नव्या आदेशानुसार गुरुवारपासून मासळी, मटण, चिकन विक्री करणारी दुकाने. बेकरी तसेच इतर साहित्याची विक्री करणारी दुकाने, याशिवाय भाजीपाला आणि फळांची दुकाने आणि महापालिकेने तात्पुरती सुरू केलेली दुकाने बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच व्यवस्था मात्र सुरू ठेवण्यात आली आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.