थकीत करांवर महिनाभर दंड, शास्ती न घेण्याचा ठाणे पालिकेचा निर्णय

ठाणे : महापालिकेचा मालमत्ता आणि पाणीकर वसूल करण्यावर भर देण्यापाठोपाठ आता प्रशासनाने कराची थकीत रक्कम वसूल करण्याकडे मोर्चा वळविला असून त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार येत्या ३१ जानेवारीपर्यंत दंड आणि शास्तीवर शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल व्हावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या करापोटी ६५० कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. एप्रिल महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तो रोखण्याच्या कामात पालिका यंत्रणा व्यस्त झाली. त्यामुळे या कराची वसुली होऊ शकली नव्हती. कराचा पैसा जमा होत नसल्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून महापालिकेने मालमत्ता आणि पाणी कराच्या वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली. करोना काळात अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या तसेच उद्योग धंदेही बंद पडले. यामुळे नागरिक कर भरतील की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असले तरी आतापर्यंत ३७५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुली करण्यात पालिकेला यश आले. त्यापाठोपाठ महापालिका प्रशासनाने आता थकीत कर वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत येत्या ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराचा भरणा केल्यास त्यावरील दंड, व्याज आणि शास्ती (वाणिज्य वगळून) शंभर टक्के माफ करण्याची सूचना करण्यात आली होती. या सूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत असून त्याचा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचा दावा या वेळी करण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सुरू केली आहे. या अभय योजनेत थकीत मालमत्ता आणि पाणीकराची रक्कम आणि चालू वर्षांच्या कराची रक्कम एकत्रित भरेल, त्याच करदात्यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे.