|| किशोर कोकणे

पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांना दंड आकारण्याचा ठाणे पालिकेचा निर्णय; केंद्रीय जीव जंतू कल्याण मंडळाचा मात्र आक्षेप

ठाणे : रस्ते, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना धान्य वा खाद्य टाकणाऱ्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. पालिकेच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या जीव व जंतू कल्याण मंडळाने आक्षेप घेतला असून प्राणी-पक्ष्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालण्यास कुणीही रोखू शकत नाही, असे पत्र पालिकेला पाठवले आहे. तसेच दंड आकारणीचा इशारा देणारे फलक पालिकेने तातडीने काढावेत, अशी सूचनाही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांत कबुतरांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. या कबुतरांच्या पिसांमुळे तसेच विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेंसेटिव्ह न्यूमोनिया’ (एचपी) हा आजार बळावण्याचे प्रमाण वाढत आहे. फुप्फुसांचा आजार असलेल्यांना ‘एचपी’चा धोका अधिक असल्याचे वैज्ञानिक निरीक्षणातून समोर आले आहे. ठाण्यातील हरिनिवास चौक, पाचपाखाडी भागात मोठ्या प्रमाणात कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जातात. यामुळे या भागात कबुतरखाने तयार झाले आहेत. या कबुतरखान्यांविरोधात परिसरातील रहिवाशांकडून तक्रारी येऊ लागल्यानंतर ठाणे महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मज्जाव केला. तसेच अशा कबुतरखान्यांच्या ठिकाणी फलक लावून खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांस ५०० रुपये दंड आकारण्याचा इशारा देणारे फलकही लावले. मात्र, केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील भारतीय जीव व जंतू कल्याण मंडळाने पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

या फलकांची माहिती केंद्र सरकारच्या भारतीय जीव व जंतू कल्याण बोर्डचे मुंबई विभागाचे अधिकारी मितेश जैन यांना मिळाली होती. त्यांनी यासंदर्भात भारतीय जीव व जंतू कल्याण बोर्डकडे यासंबंधी तक्रार नोंदवली. त्यानंतर बुधवारी बोर्डचे सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी ठाणे महापालिकेला हे फलक हटविण्यासंदर्भात सूचना केली आहे. तसेच अशा प्रकारे प्राणी आणि पक्ष्यांना दाणे टाकण्यास नागरिकांना कोणीही रोखू शकत नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

नौपाडा तसेच आसपासच्या परिसरांत कबुतरांना दाणे तसे इतर पदार्थ टाकण्यास विशिष्ट समाजातील नागरिकांचा पुढाकार दिसून येत असतो. या भागातील काही व्यापारीदेखील चौकात अशा प्रकारचे धान्य टाकत असतात. नौपाडा परिसरातील रहिवाशांनी मात्र अशा कृत्यांना आक्षेप घेतला आहे. करोनाकाळात तर यासंबंधी भीती अधिक वाढली. त्यामुळे रहिवासी अधिक आक्रमक झाले. दरम्यान, महापालिकेच्या भूमिकेवर केंद्र सरकारच्या एका विभागाने आक्षेप नोंदविल्याने नौपाड्यात या मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेने कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये असे फलक बसविल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी प्राणी आणि पक्षिमित्र संघटनांकडून आल्या होत्या. नियमानुसार प्राणी आणि पक्ष्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालण्यास कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे महापालिकेने बसविलेले फलक हटविण्याची विनंती करण्यात आलेली आहे. – मितेश जैन, अधिकारी, भारतीय जीव व जंतू कल्याण बोर्ड

ठाणे महापालिकेकडे नागरिकांच्या कबुतरखान्यांसंदर्भातील तक्रारी आल्यानंतर आम्ही हे फलक बसविले होते. यानंतर आता भारतीय जीव व जंतू कल्याण बोर्डचे पत्र आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करण्यात येईल. – संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका