गुन्हे दाखल करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिकांचा एकीकडे तुटवडा भासत असताना खासगी करोना रुग्णालयांत कामावर येण्यास हयगय करणाऱ्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बुधवारी दिला. खासगी करोना रुग्णालयांत गैरहजर राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असून यामुळे दाखल रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

ठाणे महापालिकेतील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या परिस्थितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एखादा डॉक्टर, परिचारिका अथवा आरोग्य कर्मचारी ठोस कारणाशिवाय सातत्याने गैरहजर राहत असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त सिंघल यांनी दिली. दरम्यान, करोनाचा सामना करत असताना खासगी डॉक्टरांचे सहकार्य महत्त्वाचे असून त्यांनी यापुढेही ते कायम ठेवण्याची गरज आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

तीन रुग्णालये रडारवर

ठाणे शहरात महापालिकेने यापूर्वीच आठ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड विभाग सुरू केले आहेत. ठाणे शहरात जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कळवा येथील महापालिका रुग्णालयांचा अपवाद वगळला तर आरोग्य यंत्रणेचे जाळे फारच विस्कळीत आहे. त्यामुळे करोनाची साथ पसरताच पहिल्या टाळेबंदीपासूनच महापालिकेने खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यास सुरुवात केली. खासगी रुग्णालये, त्यामध्ये काम करणारे डॉक्टर आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना अधिगृहित करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. दरम्यान, कौशल्या रुग्णालय, होरायझन प्राइम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रुग्णालयांतील डॉक्टर आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर होत नसल्याने या रुग्णालयांमधून पुरेशा प्रमाणात रुग्णांवर उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. खासगी करोना रुग्णालयांमधून रुग्णांकडून उपचारांसाठी मोठय़ा प्रमाणावर बिलांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारीही मध्यंतरी वाढू लागल्या होत्या. यामुळे ठरावीक दरांनुसारच उपचाराचा खर्च वसूल केला जावा, असे आदेश महापालिकेने मध्यंतरी काढले होते. असे असताना आता या रुग्णालयांमधून डॉक्टर आणि परिचारिका कामावर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी असून उपचारांचा डोलारा ढासळण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने वरील तीन रुग्णालयांमधील सेवेत हजर होत नसलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

प्राधिकृत अधिकारी

होरायझन प्राइम रुग्णालयासाठी डॉ. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॉ. शलाका खाडे आणि कौशल्या रुग्णालयासाठी डॉ. अश्विनी देशपांडे हे वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहेत.