आठवडय़ातून एकदाच रस्ते धुण्याचा ठाणे पालिकेचा निर्णय

ठाणे शहरातील धुळीला प्रतिबंध बसावा आणि प्रदूषणापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी महापालिकेने आखलेला रस्ते धुण्याचा कार्यक्रम दररोज मध्यरात्रीनंतर राबविला जाणार आहे. कोपरी येथे महापालिकेचे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज २० दशलक्ष लिटर इतके स्वच्छ पाणी तयार केले जाते. रस्ते धुण्यासाठी या पाण्याचा वापर केला जाणार असून एक रस्ता आठवडय़ातून एकदाच धुतला जाईल, अशाप्रकारे नियोजन केले जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये धुळीचे प्रदूषण वाढल्याचे पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाले होते.  या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार दिवसांपूर्वी बैठक घेतली. त्यामध्ये धुळीला प्रतिबंध बसावा यासाठी मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्याने शहरातील रस्ते धुण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या आदेशानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्याने शहरातील रस्ते धुऊन काढण्यासाठी नियोजन आखण्यास सुरू केले आहे. या नियोजनासाठी शहर अभियंता, दोन उपनगर अभियंता आणि चार कार्यकारी अशी समिती तयार करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेतील अभियंत्यामार्फत या उपक्रमासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये डांबरी आणि यूटीडब्लूटीच्या रस्त्यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणानुसार शहरातील १०० किलोमीटर रस्त्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. हे रस्ते धुण्यासाठी कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी टँकरच्या साहाय्याने उचलण्यात येणार आहे.

दहा टँकरचा वापर या उपक्रमासाठी केला जाणार आहे. दररोज रात्री १२ ते ५ यावेळेत रस्ते धुतले जाणार असले, तरी प्रत्येक रस्ता ठरलेल्या वारानुसार म्हणजेच आठवडय़ातून एकदाच धुतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असले तरी कोणता रस्ता केव्हा धुवायचा आणि त्यासाठी किती यंत्रणा लावायची, याचे नियोजन सुरू आहे. हे काम येत्या दहा दिवसात पूर्ण होणार असून, त्यानंतर हा उपक्रम प्रत्यक्षात राबविला जाणार आहे.

– अनिल पाटील, शहर अभियंता, ठाणे महापालिका