ठाण्यातील बेकायदा बांधकामे महापालिकेकडून जमीनदोस्त; व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची मागणी
ठाणे शहराला विकास हवाच आहे, परंतु विकासाच्या नावाखाली गरिबांचे संसार उघडय़ावर पाडले जात असल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ नगरसेवकांनी शनिवारी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असणाऱ्या ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील हजारो बांधकामांवर गेल्या काही दिवसात महापालिकेने बुलडोझर फिरवला आहे. यामुळे येथील राजकीय वर्तुळात कमालीची अस्वस्थता असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केलेल्या कारवाईविरोधात आतापर्यंत एकही पक्ष उघडपणे पुढे आला नव्हता. कळवा, मुंब्रा परिसरात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन बाधित झालेल्या व्यावसायिकांचे तातडीने पुनर्वसन केले जावे, अशी मागणी केली. या नगरसेवकांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी केले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रकल्प आखले आहेत. रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत पोखरण, घोडबंदर, ठाणे स्थानक रस्त्यावरील हजारो बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली आहेत. ठाणेकरांचा प्रवास कोंडीमुक्त व्हावा यासाठी रस्ते रुंद केले जात असल्याने जयस्वाल यांनी आखलेल्या मोहिमेस विरोध करण्यासाठी एकही राजकीय पक्ष उघडपणे पुढे आलेला नाही. ठाणे स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर कारवाई झाल्याने भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी मध्यंतरी या भागात पाहाणी दौरा केला खरा, मात्र मोहिमेविरोधात उघडपणे बोलण्याचे त्यांनी टाळले.
दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून महापालिकेने मुंब्रा तसेच कळवा परिसरात जोरदार कारवाई सुरू केली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय तसेच कळवा नाक्यावरील शिवसेना शाखा जमिनदोस्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता आहे. मुंब्रा भागातील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने, पक्की बांधकामे पाडण्यात आल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक अस्वस्थ असून शनिवारी या सर्वानी एकत्र येत महापालिकेविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा
दिला. येत्या १७ मे रोजी कळवा नाकापासून महापालिका मुख्यालयापर्यंत संघर्ष यात्रा काढली जाईल तसेच विधान परिषदेची निवडणूक संपताच पक्षाचे नगरसेवक राजीनामा देतील, अशी माहिती ऋता यांनी पत्रकार परिषदेत दिली.