ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना बुधवारी संध्याकाळी फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत माळवी जखमी झाले असून नौपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मारहाणीच्या या घटनेनंतर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत.

महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आणि त्यांचे पथक बुधवारी संध्याकाळी ठाणे पश्चिमेतील गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करत होते. या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध दर्शवला. सुमारे शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने माळवी यांना घेरले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत माळवी जखमी झाले आहेत. मारहाणीत माळवी यांचे कपडे फाटल्याचे समजते. या मारहाणीप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच फेरीवाल्यांनाही ताब्यात घेतले आहे. जखमी माळवींवर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संदीप माळवींना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर ठाण्यातील फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. या फेरीवाल्यांची अधिकाऱ्यावर हात उचलण्याची हिंमत झालीच कशी असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.