समूह पुनर्विकासाला ठाणे महापालिकेची चालना; २० कोटी रुपयांची तरतूद

ठाणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे सात महिन्यांपूर्वी भूमिपूजन होऊनही कागदावरच राहिलेल्या बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेला चालना देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून योजनेतील नागरिकांना तात्पुरत्या निवासासाठी एमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिका आणि महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिरातील घरे भाडे न आकारता राहाण्यास देणार आहेत. तसेच या दोन्ही ठिकाणी जागा उपलब्ध नसेल तर संबंधित नागरिकांना भाडे देण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे सादर केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडय़ा, चाळी, धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी समूह पुनर्विकास योजना राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर पालिका प्रशासनाने ४४ नागरी समूह आराखडे तयार केले होते. या योजनेचा पहिला टप्पा किसननगर आणि हाजुरी भागात राबविण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सात महिन्यांपूर्वी झाले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला गती येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच करोना प्रादुर्भावामुळे ही योजनेची अंमलबजावणी रखडली. असे असतानाच या योजनेला चालना देण्यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून योजनेतील नागरिकांना विनाभाडे तात्पुरत्या निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रस्ताव काय आहे?

ठाणे महापालिकेला एमएमआरडीएकडून प्राप्त झालेल्या भाडेतत्त्वावरील योजनेतील सदनिका १६० चौरस फुटांच्या आहेत. या सदनिका समूह पुनर्विकास योजनेमध्ये तसेच त्यालगत असलेले रस्ते, आरक्षणामधून बाधित होणाऱ्या पात्र भोगवटाधारकांना कोणतेही भाडे न आकरण्याचे प्रस्तावित आहे.

’ तीनशे चौरसफुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या भोगवटाधारकांना एक सदनिका, ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या भोगवटाधारकरांना दोन सदनिका, तर ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या भोगवटाधारकाला सदनिकाऐवजी घरभाडे देणे, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

’ समूह पुनर्विकास योजनेच्या जवळ असलेल्या मोकळ्या आरक्षित भूूखंडांवर किंवा महापालिकेला प्राप्त झालेल्या भूखंडांवर भांडवली खर्चातून संक्रमण शिबिरांची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी सदनिकांचे क्षेत्रफळ ३० चौरस मीटर ठेवण्यात येणार आहे.

’ एमएमआरडीए, पालिकेच्या संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध नसतील तर भोगवटाधारकाला भाडे देण्याचा पर्याय सुचविला आहे. सेक्टर १, २, ३ मधील नागरी समूह आराखडय़ातील भोगवटाधारकांचे घर ३०० चौरस फुटांपेक्षा कमी असेल तर त्यांना महिना पाच हजार, पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी असेल तर त्यांना महिना सात हजार,पाचशे चौरस फुटांपेक्षा जास्त असेल तर त्यांना आठ हजार घरभाडे देण्यात येणार आहेत.