अन्य यंत्रणांनी रस्ते दुरुस्तीचा निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : विविध यंत्रणांच्या ताब्यात असल्यामुळे आणि समन्वयाअभावी दुरुस्तीविना चाळण झालेल्या ठाण्यातील रस्त्यांची कामे आता लवकर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शहरातील रस्त्यांचा ताबा असलेल्या यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील रस्ते दुरुस्तीचा खर्च ठाणे महापालिकेकडे वर्ग करावा व या निधीतून पालिकेने दरवर्षी पावसाळय़ापूर्वी दुरुस्तीची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

ठाणे शहरातील तीन हात नाका उड्डाणपूल, कॅडबरी जंक्शन उड्डाणपूल, कापूरबावडी उड्डाणपूल, घोडबंदर रस्त्यावरील उड्डाणपूल, कापूरबावडी ते आत्माराम पाटील चौक (भिवंडी बाह्य़वळण), मुंब्रा बाह्य़वळण हे शहरातील प्रमुख रस्ते राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजानिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध यंत्रणांच्या अखत्यारीतील येतात. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारीही या यंत्रणांची असते. असे असले तरी दरवर्षी पावसाळ्यात पडलेले हे खड्डे भरायचे कोणी, असा प्रश्न उभा राहतो. मात्र, आता अधिकृतपणे पालिकेकडेच या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी येणार आहे.

नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी यंदा पावसाळ्यात हाती घेतलेली कामे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पुढील वर्षीपासून सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तरतूद करून ती रक्कम एप्रिल महिन्यात ठाणे महापालिकेकडे वर्ग करावी, अशा सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासाठी आवश्यक तो धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले. ठाणे महापालिकेने जानेवारी महिन्यातच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील प्रक्रिया सुरू करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजीची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. या बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नगरविकास विभागाचे सचिवदेखील उपस्थित होते.

वाहतुकीला कोंडीचे ग्रहण कायम

ठाणे : ठाणे, कल्याण, शिळफाटा, भिवंडी भागात सोमवारी पुन्हा एकदा मोठी वाहन कोंडी झाल्याने या भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी अडकून पडले. आठवडय़ाचा पहिला दिवस आणि वाहतूक कोंडी समीकरण सुटता सुटत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

कल्याण शिळफाटा मार्गावर पडलेले खड्डे, अतिR मणामुळे काही ठिकाणी अरुंद झालेले रस्ते, रस्त्यांची रडतखडत सुरू असलेली कामे यामुळे ही वाहतूक कोंडी भयावह रूप धारण करताना दिसत आहे. सोमवारी सकाळपासूनच शिळफाटा, काटई, देसाई गाव भागात मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक बेशिस्त पद्धतीने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत होती. वाहन चालकांना ७ ते ८ किलोमीटर अंतरासाठी दोन ते अडीच तास घालवावे लागले.

गोदामांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांचा आकार अडीच ते तीन फूट लांब इतका पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमवारी यामार्गे ठाणे तसेच कल्याणहून भिवंडीत येणाऱ्या लहान वाहनांमधील प्रवासी कोंडीत अडकून पडले.

पूर्व द्रुतगती मार्गावरील नाशिक मुंबई मार्गावर ११ वाजेच्या सुमारास कोपरी आनंदनगर ते तीन हात नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईत जाणाऱ्या वाहन चालकांना याचा फटका सहन करावा लागला.