संरचनात्मक परीक्षण अहवालाच्या आधारे प्रशासनाचा प्रस्ताव; ६ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील नागरी सुविधांचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पाचपाखाडी भागातील महापालिका मुख्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुख्यालय इमारतीच्या संरचनात्मक परीक्षण अहवालाच्या आधारे प्रशासनाने दुरुस्तीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये इमारतीच्या छतावरील गळती, इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी पाच कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गडकरी रंगायतन या नाटय़गृहाच्या छतावर कायमस्वरूपी वेदर शेड टाकण्यात येणार आहे.

महापालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम १९८९ मध्ये करण्यात आले असून या बांधकामास आता २७ वर्षे झाले आहेत. त्यामुळे या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मुख्यालय इमारतीचे संपूर्ण संरचनात्मक परीक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल नुकताच महापालिकेस प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार इमारतीचे बांधकाम सुस्थिती असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी इमारतीतील काही दुरुस्तीची कामे अहवालात सुचविण्यात आली आहे.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने इमारतीच्या दुरुस्तीची कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये इमारतीच्या छतावरील गळती, दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी पाच कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

नाटय़गृहावर पावसाळी छत..

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गडकरी रंगायतन या नाटय़गृहाचे बांधकाम १९७८ साली केले आहे. या बांधकामाचे नुकतेच संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. या अहवालामध्ये काही दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली असली तरी बांधकाम सुस्थिती असल्याचे म्हटले आहे. तसेच नाटय़गृहावर पावसाळी छत टाकण्याच्या सूचनाही अहवालात केल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नाटय़गृहाच्या छतावर वेदर शेड टाकण्याचा निर्णय घेतला असून या शेडसाठी दोन कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.