जवाहरबाग स्मशानभूमीतील चिमणीतील तांत्रिक दोषाकडे पालिकेचे दुर्लक्ष 

ठाणे : करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गोंधळलेल्या ठाणे महापालिकेचे शहरातील इतर समस्यांकडेही डोळेझाक होऊ लागली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जवाहरबाग स्मशानभूमीतील शवदाहिनीतून निघणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचा जीव अक्षरश: गुदमरत आहे. या भागातील हजारो नागरिकांच्या व्यथांकडे आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.

या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीतून निघणाऱ्या धुराचे नियोजन करण्यासाठी बसविण्यात आलेल्या चिमणीत तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. ती बदलण्याचे काम येत्या काही दिवसात पुर्ण केले जाईल असे आश्वासन अभियांत्रिकी विभागामार्फत या भागातील रहिवाशांना दिले जात आहे. प्रत्यक्षात काम सुरू नसल्याने स्मशानभूमीतून निघणारे धुरांचे लोट आसपासच्या हजारो नागरिकांसाठी त्रासाचे कारण ठरले आहे. करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे उपाय आखणाऱ्या महापालिकेचे या धुरामुळे नागरिकांना होणाऱ्या श्वसनाचे आजारांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, अशी टीकाही होत आहे.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदान परिसरात जवाहरबाग स्मशानभूमी आहे. काही महिन्यांपूर्वीच ठाणे महापालिकेने जितो ट्रस्ट आणि सहियारा शैक्षणिक-वैद्यकीय ट्रस्टच्या सहकार्याने या स्मशानभूमीचे नूतनीकरण केले होते. गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर असताना स्मशानभूमीचे काम अर्धवट असतानाही या स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. सद्यस्थितीत या स्मशानभूमीचे सुमारे ४० टक्के काम अद्यापही शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे असलेले चिमणींचे काम अद्यापही शिल्लक आहे.

‘पर्यायी व्यवस्था करा’

या स्मशानभूमीचे नूतणीकरणाचे कंत्राट गुजरातमधील एका कंपनीला दिले होते. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर तेथील कंत्राटदाराशी संपर्क झाला आहे. त्याने कामाची तयारी दर्शवली आहे. सध्या जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार इतर ठिकाणच्या स्मशानभूमीत केल्यास चिमणीतील तांत्रिक दोष तातडीने दूर करता येईल. त्यासंबंधीचे पत्र आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती शहरविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करण्यात आला होता. या चिमणीचा त्रास नागरिकांना होत आहे. याविषयी तीन बैठका अधिकाऱ्यांसोबत दालनात झालेल्या आहेत. नवी चिमणी याठिकाणी आलेली आहे.

– पल्लवी कदम, उप महापौर, ठाणे.