रुग्णांकडून आतापर्यंत एक कोटी ८२ लाखांची जादा देयके आकारल्याचे उघड

ठाणे : महापालिकेने घोषित केलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील रुग्णांकडून एक कोटी ८२ लाख रुपयांच्या देयकांची जादा रक्कम वसूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने नेमलेल्या विशेष लेखापरीक्षक समितीने केलेल्या तपासणीत या रकमेची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी १५ रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात रुग्णांकडून वसूल केलेल्या ३,३४७ देयकांची तपासणी विशेष पथकाने पूर्ण केली आहे.

महापालिकेने बजाविलेल्या नोटिसानंतर आतापर्यंत १५ रुग्णालयांनी २६ लाख ६८ हजारांची रक्कम रुग्णांना परत केली आहे. उर्वरित रकमाही लवकरात लवकर परत केल्या जाव्यात, अशा प्रकारचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काढले आहेत. ठाणे महापालिकेने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयांची मान्यता दिली. मात्र काही रुग्णालयांकडून जास्त रकमेची देयके वसूल केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या. त्यानंतर महापालिकांनी उपचाराचे दरपत्रक निश्चित करून त्याप्रमाणे देयके वसूल करण्याचे आदेश रुग्णालयांना दिले होते. त्यानंतरही अशा प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरूच होता. अखेर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तक्रारींची गंभीर दखल घेऊन रुग्णांकडून वसूल केलेली देयके तपासणीचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्य लेखापरीक्षक किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. या पथकाने रुग्णालयांकडून आतार्पयची सर्वच देयके तपासणीसाठी मागितली होती. त्यानुसार १० जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत पथकाकडे आतापर्यंत ४१०६ देयके प्राप्त झाली असून त्यापैकी ३३४७ देयकांची पथकाने तपासणी पूर्ण केली आहे. त्यामध्ये १३६२ देयकांवर पथकाने आक्षेप नोंदविला आहे.

कोणत्या रुग्णालयाकडून जादा रकमेची आकारणी?

रुग्णालय           जादा रकमेची आकारणी

* होरायझन               ५४ ,६३ ,0३९

* कौशल्य                २ लाख २५ हजार

* ठाणे हेल्थ केअर         १४ लाख ३६ हजार

* टायटन                 ९ लाख ५० हजार

* मेटोपॉल                १० लाख ८१ हजार

* लाइफकेअर             २ लाख १६ हजार

* सिद्धिविनायक           ३ लाख ३९ हजार

* पाणंदीकर              ४ हजार

* स्वस्तिक               २ लाख ८९ हजार

* एकता                 १६ लाख ७४ हजार

* बेथनी                  १८ लाख ९८ हजार

*आरोग्य मल्टीस्पेशलिस्ट    २३ हजार ४५०

* वेदांत                  १७ लाख ३८ हजार

* सफायर                १८ लाख ७३ हजार

* काळसेकर              ७ लाख ६२ हजार

* स्वयम                 ७१ हजार ५०६

रुग्णालयांमधील देयकांसंबंधी देखरेख ठेवण्याची प्रक्रिया नियमित सुरू आहे. त्यामुळे या रकमेत येत्या काळात आणखी वाढ होऊ शकते. असे असले तरी रुग्णालय व्यवस्थापनांना आपण आकारत असलेल्या देयकांचे नियमित विश्लेषण करावे लागत आहे. यामुळे वाढीव बिलांच्या आकारणीत काही प्रमाणात चाप बसू शके ल.

डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका