निम्म्याच गृहसंकुलांच्या आवारात प्रकल्पासाठी जागा; उर्वरित गृहसंकुलांसाठी प्रकल्प राबवण्याची योजना 

ठाणे : प्रतिदिन १०० किलोपेक्षा अधिक वजनाचा कचरा जमा होणाऱ्या आणि पाच हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या गृहसंकुले आणि आस्थापनांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारणे पालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र, ठाण्यातील जवळपास ५० टक्के गृहसंकुलांच्या आवारांतच कचरा विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध असल्याचे पालिकेच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता उर्वरित गृहसंकुलांसाठी त्या त्या परिसरात कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्याची योजना पालिकेने आखली आहे.

केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार पालिकेने गृहसंकुलांना कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प उभारणे बंधनकारक केले. ठाणे शहरातील  ४२५ हून अधिक गृहसंकुले, हॉटेल, मॉल, रुग्णालयांना तशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, अशा प्रकल्पासाठी संकुलाच्या आवारात पुरेशी जागा नाही आणि खर्चही परवडणारा नाही, असे सांगत गृहंसकुलातील रहिवाशांनी विरोध केला होता.  असे असतानाच ४२५ पैकी केवळ १९० गृहसंकुले आणि आस्थापनांमध्येच कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविणे शक्य असल्याची प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे ज्या संकुलांमध्ये कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविणे शक्य नाही, त्या परिसरात पालिकेच्या माध्यमातून कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविता येऊ शकतात का, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

प्रकल्प उभारण्याची जागा असलेल्या १९० पैकी ९५ गृहसंकुले वा आस्थापनांच्या आवारात ५० टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर, उर्वरित ९५ ठिकाणी संकुलातील अंतर्गत वाद तसेच खर्च परवडत नसल्यामुळे प्रकल्प सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी संकुलांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्या ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

ज्या संकुलांमध्ये कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविणे शक्य नाही, त्या परिसरात पालिकेच्या माध्यमातून कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविता येऊ शकतात का, याचा विचार सुरू आहे.

संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका