रुग्णालयांच्या पुनर्नोदणीबाबत नवे धोरण; अग्निशमन तरतुदी शिथिल

ठाणे :  ठाणे महापालिका प्रशासनाने नर्सिग होम कायद्याचा आधार घेत रुग्णालयांच्या पुनर्नोदणीबाबत नवे धोरण आखले असून यानुसार अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला तसेच वापर बदलाच्या परवानगीअभावी रखडलेल्या रुग्णालयांच्या नव्याने नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. ही नोंदणी होत असल्याने ठाणे शहरातील अनेक रुग्णालयांवर कारवाईची टांगती तलवार होती. दरम्यान, हा निर्णय घेत असताना वापर बदल आणि कंपाऊंडिंग शुल्कचे धोरणही शिथिल करण्यात आले आहे.

नव्या धोरणानुसार रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणासाठी अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसली तरी आगप्रतिरोधक यंत्रणा सक्षम आणि कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र मात्र घ्यावे लागणार आहे. वापर बदल केलेले नकाशे, नियमित केलेले नकाशे, वास्तुविशारदांना प्रमाणित केलेला जागेचा नकाशा, विद्युत परीक्षण, तीस वर्षांपेक्षा जुनी इमारत असल्यास बांधकाम संररचनात्मक परीक्षण अहवाल या सर्वाची पूर्तता केल्यानंतरच हे प्रमाणपत्र मिळणार आहे. अग्निसुरक्षा निकर्षांची पूर्तता केली नाही तर रुग्णालयांची पुनर्नोदणी केली जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली होती. तसेच रुग्णालयातील वापर बदलाबाबतच्या परवानगीही सादर करण्याचे आदेश दिले होते. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आदेश देण्यात आले होते. शहरातील रुग्णालय चालकांकडून या निर्णयास विरोध करण्यात आला होता. ठाणे शहरातील बहुतांश रुग्णालये जुन्या इमारतींमध्ये असून त्यांच्याकडे वापर बदलाबाबतची परवानगी उपलब्ध नाही. तसेच या इमारतीमध्ये अग्निसुरक्षेच्या निकषांची पूर्तता करणे शक्य नसल्याचे रुग्णालय चालकांचे म्हणणे होते. महापालिकेच्या आदेशामुळे अनेक रुग्णालयांची पुनर्नोदणी धोक्यात आल्याने ती बंद पडण्याच्या मार्गावर होती.

नवे धोरण फायदेशीर

महापालिका प्रशासनाने रुग्णालयांच्या पुनर्नोदणीसाठी नवे धोरण आखण्याचा निर्णय घेतला होता. नर्सिग होम अ‍ॅक्ट १९४९ अन्वये नर्सिग होम, मॅटर्निटी होम आणि रुग्णालयांचे नोंदणीकरण करण्यात येते. या कायद्यातील कलम चार आणि पाचनुसार परवाना ना मंजूर करण्याच्या तरतुदींचा स्पष्ट उल्लेख असून त्यात अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला किंवा वापर बदलाबाबतची कोणतीही अट नमूद करण्यात आलेली नाही. याच कायद्याचा आधार घेत नवे धोरण आखण्यात आले आहे. या धोरणानुसार रुग्णालयांना नोंदणी करता येऊ शकणार आहे. हे करत असताना या रुग्णालयांसाठी अग्निसुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यासंबंधीची स्वतंत्र नियमावली पालिकेने तयार केली आहे.

धोरणात काय?

’ १९७४ पूर्वीच्या बांधकामांमध्ये एखादे रुग्णालय विनावापर परवाना नसतानाही सुरू असले तर अशा व्यवस्थापनांना वापर बदलाची प्रक्रिया करण्याची गरज नाही.

’ १९७४ ते ८२ या कालावधीतल्या अधिकृत इमारतींमध्ये विनापरवाना वापर सुरू असल्यास वापर बदलासाठी १९७४ सालच्या विकास नियंत्रण नियमावलीतल्या तरतुदी लागू असतील, असे धोरण ठरविण्यात आले आहे.

’ १९९५ ते २०१० या कालावधीसाठी इमारत पूर्णत: वाणिज्य असेल आणि रुग्णालय पहिल्या मजल्यावर असेल तर इमारतीला दुसरा जिना नसेल तरी वापर मंजूर करावा, असे ठरविण्यात आले आहे.

’ दुसऱ्या मजल्यावर रुग्णालय असेल आणि दुसरा जिना नसेल तर मंजुरीसाठी काही अटी नमूद करण्यात आल्या आहेत.

’ याशिवाय १० खाटांपेक्षा कमी आकाराच्या रुग्णालयांसाठी काही विशेष अटी टाकण्यात आल्या आहेत.