जुन्या वसाहतींना ठाणे महापालिकेच्या नोटिसा

ठाणे : महापालिका क्षेत्रातील साडेचार हजार धोकादायक इमारतींची यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या १२४ इमारतींना प्रशासनाने नोटीस बजावून इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इमारतींना २५ हजार रुपये किंवा वार्षिक मालमत्ता कराच्या रकमेइतका दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. असे परीक्षण करून घेणे रहिवाशांना सोयीचे ठरावे यासाठी महापालिकेने १२४ संरचना अभियंत्यांच्या नावाची यादी त्यांच्या क्रमांकासह जाहीर केली आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येते आणि त्यानंतर इमारतींचे बांधकाम पाडण्यात येते. यंदाही पालिकेने शहरातील साडेचार हजार धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये ७३ इमारती अतिधोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारती रिकाम्या करण्यासंबंधीच्या नोटिसा पालिकेने रहिवाशांना पाठविल्या आहेत. या इमारती पाडण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नुकतेच दिले असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यापाठोपाठ शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या १२४ इमारतींना प्रशासनाने नोटिसा धाडल्या आहेत. या नोटिसांमध्ये इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

नोटिशीमध्ये काय आहे?

* ठाणे महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्यांमार्फतच इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घ्यावे.

* या अभियंत्यांकडून संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पालिकेला सादर करावा.

* या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इमारतींना २५ हजार रुपये किंवा वार्षिक मालमत्ता कर यापैकी जी जास्त रक्कम असेल, तितका दंड आकारण्यात येणार आहे.

दरवर्षी रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ३० वर्षे जुन्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही अशा इमारतधारकांना नोटिसा बजावून संरचनात्मक परीक्षण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका