शहरांतर्गत प्रवासासाठी भाडय़ाने सायकली पुरवणार; ५० बसथांब्यांवर ५०० सायकली

टीएमटीसारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेच्या मर्यादा, रिक्षाचालकांची अरेरावी आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी यांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने नागरिकांना प्रवासाचा नवीन आणि स्वस्त पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावानुसार, शहरातील ५० महत्त्वाच्या बसथांब्यांवर प्रत्येकी दहा सायकली पालिका उपलब्ध करून देणार असून या सायकली भाडेतत्त्वावर घेऊन प्रवासी आपल्या इप्सित ठिकाणी जाऊ शकतील. त्यामुळे प्रवाशांना बस व रिक्षांसाठी करावी लागणारी प्रतीक्षा थांबणार आहेच; पण याचा प्रसार वाढल्यास वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यातही मदत होणार आहे. अशी योजना राबवणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

ठाणे शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुकीची भिस्त बहुतांशी रिक्षांवर अवलंबून आहे. मात्र जादा भाडे आकारणी, दूरच्या अंतरावर जाण्यास नकार, रिक्षाचालकांची अरेरावी यांमुळे रिक्षाप्रवास नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. दुसरीकडे, महापालिकेची परिवहन सेवा आजारी अवस्थेत असल्याने प्रवाशांना बससेवेचाही उपयोग होत नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने आता ठाणेकरांना भाडेतत्त्वावर सायकलसुविधा पुरवण्याचा विचार चालवला आहे. या योजनेनुसार, शहरातील ५० महत्त्वाच्या बसथांब्यांजवळ प्रत्येकी दहा सायकल उपलब्ध करून देण्यात येतील. या थांब्यांवरून कोणत्याही नागरिकाला सायकल भाडय़ाने घेऊन इच्छित ठिकाण गाठता येईल व आपले काम उरकून पुन्हा परत येऊन सायकल ठेवता येईल. या सायकलींवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार असून त्या यंत्रणेच्या आधारे सायकलींचे नेमके ठिकाण जाणून घेता येईल. त्यामुळे सायकलींची चोरी होण्याचे प्रकार टाळता येतील. वापरकर्त्यांना स्मार्टफोनद्वारे सायकलीचे भाडे भरण्याची सुविधाही देण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

मेसर्स न्यू एज मीडिया पार्टनर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने यासंदर्भात पालिकेकडे प्रस्ताव सादर केला असून सायकली उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात पालिकेला या संस्थेला बसथांब्यांजवळ सायकलथांबे उभारण्यासाठी २० फूट लांब व सहा फूट रुंद जागा पुरवावी लागेल. या सायकल थांब्यांवर जाहिराती दर्शवण्याचे अधिकार संबंधित संस्थेला देण्यात येतील. तसेच या प्रकल्प कालावधीत तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, सर्व समावेशक निगा, देखभाल, दुरुस्ती यांसारखी कामे संस्थेने करायची आहेत. तसेच प्रकल्पातील उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचा विमा काढणे ही कामेही संस्थेला बंधनकारक असतील.

भाडय़ाचे दर गुलदस्त्यात

शहरातील महत्त्वाच्या बसथांब्यालगत उभारण्यात येणाऱ्या या सायकल थांब्यांवर भाडय़ाने उपलब्ध होणाऱ्या सायकलींचे दर किती असतील यासंबंधीचा खुलासा मात्र अद्याप करण्यात आलेला नाही. तसेच महापालिकेने सर्वसाधारण सभेपुढे सादर केलेल्या प्रस्तावात ठेकेदारास किती दर आकारावेत यासंबंधी निर्देशही देण्यात आलेले नाहीत.