दीड महिन्यात १५२ कोटी रुपयांची वसुली

ठाणे : गेल्या दीड महिन्यात करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच मालमत्ता करवसुलीवर महापालिका प्रशासनाने विशेष भर दिल्यामुळे १५२ कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभागात सर्वाधिक ४६.०७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. तर त्याखालोखाल वर्तकनगर आणि नौपाडा-कोपरी विभागाची वसुली झाली आहे.

गेल्या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यांच्या तुलनेत यंदा तिप्पट मालमत्ता करवसुली झाली आहे. यामुळे करोना काळातही महापालिकेला मालमत्ता कराची वसुली करण्यात यश आल्याचे चित्र आहे. यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात मालमत्ता करापोटी ६९० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले. परंतु यंदा करोना संसर्ग रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यग्र असल्यामुळे करवसुली ठप्प झाली होती. त्यातच अनेक जण मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची मागणी करीत होते. असे असतानाच महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मालमत्ता कराबरोबरच इतर करांची वसुली वाढविण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. त्यानुसार १६ जुलैपासून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अधिपत्याखाली करवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

१६ जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत म्हणजेच गेल्या दीड महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत १५२.६४ कोटीर रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. गेल्या वर्षी १६ जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत मालमत्ताकराची एकूण वसुली ४२.०५ कोटी झाली होती. त्या तुलनेत यंदा तिप्पट करवसुली झाल्याचे चित्र आहे.

करोनाचा सामना आणि शहरातील विकासकामे करण्यासाठी महापालिकेची आर्थिक बाजू तितकीच बळकट असणे गरजेचे आहे. या काळातही नागरिकांनी चांगले सहकार्य केले असून यापुढेही त्यांचे आम्हाला असेच सहकार्य मिळेल.

– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त,

महापालिकेची करवसुली वाढविण्यासाठी आम्ही बारकाईने लक्ष देत आहोत. सुरुवातीचे काही महिने संपूर्ण यंत्रणा करोनाचा सामना करण्यात व्यग्र होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यापासून मालमत्ता करवसुलीस प्राधान्य दिले.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका