बुधाजी नगर ते कळवा स्थानक रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी
ठाण्यातील पोखरण रोड तसेच घोडबंदर मार्गावर सेवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी युद्धपातळीवर योजना राबविणाऱ्या ठाणे महापालिकेने कळवा परिसरातील बुधाजी नगर ते कळवा रेल्वे स्थानक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्ता रुंदीकरण मोहिमेला गती देण्यासाठी या परिसरातील बेकायदा बांधकामावर हातोडा फिरविण्यात आला. दरम्यान, येथील बेकायदा इमारतीमधील १२ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला असून कारवाईमुळे रस्त्यावर आलेल्या एकाही कुटुंबाला बेघर होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे.
बेकायदा बांधकामे, झोपडय़ा यामुळे कळवा परिसराची अक्षरश: कोंडी झाली असून ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात नियोजित करण्यात आलेले अनेक रस्ते या बांधकामांनी गिळले असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. याच भागातील बुधाजी नगर ते गांधी नगरपासून पुढे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी नागरिकांना शंकर मंदिरमार्गे मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे रहिवाशांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. तथापि बुधाजी नगर ते गांधी नगर हा १८० मीटरचा रस्ता प्रत्यक्षात अवतरल्यास विटावा, बुधाजी नगर या परिसरांतील नागरिकांना अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे स्थानकात पोहोचता येणार आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या परिसराची पाहणी करून या रस्त्याची उभारणी करण्याचा निर्णय मध्यंतरी जाहीर केला. जवळपास १८० मीटर लांब आणि १८ मीटर रुंद असा प्रस्तावित करण्यात आलेल्या या रस्त्यामध्ये एकूण ७२ झोपडय़ा आणि एक तळ अधिक २ मजल्यांची धोकादायक इमारत बाधित होणार आहे. या रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांशी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संवाद साधून कोणालाही बेघर करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच धोकादायक इमारतीमधील १२ कुटुंबाच्या पुनर्वसनाचेही आश्वासन दिले होते. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनीही या नागरिकांशी बोलून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर येथील बाधित कुटुंबांचे ठाणे महापालिकेस हस्तांतरित झालेल्या भाडेपट्टय़ावरील घर योजनेत स्थलांतरित केले आहे.
दरम्यान, पुनर्वसनाचे काम पूर्ण होताच जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १चे उपायुक्त संदीप माळवी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, साहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, शहर विकास विभागाचे उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कळवा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता श्री. इताडकर यांनी या रस्त्यातील सर्व बाधित बांधकामे निष्काषित केली. ही बांधकामे आणि सर्व आनुषंगिक कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.