News Flash

बंद लॅपटॉप.. मोबाइल कचरापेटीत टाका!

महापालिका हद्दीतील विविध विभागांत इलेक्ट्रॉनिक्स कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात येणार

ठाणे महापालिकेने शहरात ‘ई-कचरा’ व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात महापालिकेचा ‘ई-कचरा’ व्यवस्थापन प्रकल्प
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बंद किंवा नादुरुस्त झाल्यानंतर भंगारमध्ये काढण्यात येतात. मात्र, अशा वस्तूंचा भंगार सामानात स्फोट घडून वा त्यांना आग लागून मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसेच या वस्तू पेटवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने शहरात ‘ई-कचरा’ व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विभागांत इलेक्ट्रॉनिक्स कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात येणार असून त्यात जमा होणाऱ्या कचऱ्याची पालिकेतर्फे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतून दररोज ६५० मेट्रिक टन सुका आणि ओला कचरा निर्माण होत असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा पालिकेकडे नसल्याने भविष्यात हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन, वीज, खत निर्माण करण्यासारखे प्रकल्प राबवण्याचे निर्णय घेतले आहेत. हे करीत असतानाच शहरातील ‘ई-कचऱ्या’च्या विल्हेवाटीचा मुद्दाही प्रखर होत चालल्याचे पालिकेच्या लक्षात आले. घरात बंद किंवा नादुरुस्त अवस्थेत असलेले जुने मोबाइल, चार्जस्, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विल्हेवाट कशी लावायची असा अनेकांपुढे प्रश्न असतो. कचऱ्यात फेकून देण्याऐवजी घराच्या एका कोपऱ्यात या वस्तू धूळ खात पडून असतात. हे लक्षात घेऊन महापालिकेने अशा कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ई-वेस्ट प्रकल्प हाती घेतला आहे. स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून हा प्रकल्प महापालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ई-वेस्ट प्रकल्पामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर खासगी लोकसहभागातून (पीपीपी) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा फेकण्यासाठी शहरातील सुमारे १०० ठिकाणी डबे ठेवण्यात येणार असून सुमारे दहा फुटापर्यंतचे हे डबे असणार आहेत, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. या संदर्भात जनजागृती मोहीमही हाती घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

वर्षांकाठी ३६ लाख किलो ई-कचरा
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांची लोकसंख्या १८ लाखांपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार एका व्यक्तीमागे वर्षांला दोन ते अडीच किलो ई-कचरा निर्माण होतो. त्यानुसार या शहरांतून वर्षांकाठी सुमारे ३६ लाख किलो ई-वेस्टची निर्मिती होण्याचा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे गृहीत धरून ई-कचरा प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:31 am

Web Title: thane municipal corporation start e waste project management
Next Stories
1 दिवाळी पहाटचा उत्साह मावळला
2 दशक्रियाविधी केंद्र मद्यपींचा अड्डा
3 कल्याणकरांची दिवाळी धुरात!
Just Now!
X