News Flash

पोलिसांच्या ‘बुलेट’ला ठाणे पालिकेची ‘किक’

पहिल्या टप्प्यात १५ रॉयल एनफिल्ड बुलेट पोलिसांना पुरवल्या जाणार आहेत.

ठाणे महापालिका

पालिकेच्या खर्चातून पोलीस दलाला गस्तीसाठी १५ दुचाकी

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रीहावी, यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याच्या हेतूने राज्य सरकारकडून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणे पोलीस दलाला अखेर महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून ठाण्यातील पोलिसांना गस्तीसाठी दुचाकी पुरवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५ रॉयल एनफिल्ड बुलेट पोलिसांना पुरवल्या जाणार आहेत. यासाठी पालिका २५ लाख रुपये खर्च करणार आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच पोलीस दलासाठी अशी मदत पुरवली जात असून यानिमित्ताने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिका आणि पोलीस दलातील समन्वय अतिशय उत्तम असून हे दोन्ही विभाग एकमेकांशी सहकार्याने वागत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. ठाणे शहरात रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेताना मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांवर हातोडा फिरविण्यात आला. शास्त्रीनगरसारख्या अतिशय संवेदनशील भागातील बांधकामेही या कारवाईदरम्यान पाडण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल ही कारवाई करत असताना पोलिसांचे पुरेपूर संरक्षण त्यांना मिळत गेले. त्यामुळे बांधकाम हस्तांतर हक्कानुसार शहरातील रस्तेही रुंद झाले आणि बिल्डरांना वाढीव चटईक्षेत्रही मिळत गेले. ठाणे महापालिकेने शहरातील काही पोलीस ठाण्यांच्या इमारतीही या धोरणानुसार बिल्डरांकडून बांधून घेतल्या. त्यामुळे जयस्वाल आणि परमबीर सिंग यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध येथील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिले जात असतात. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी वाढल्याने महापालिकेने पोलिसांच्या मदतीसाठी वाहतूक सेवकांची नेमणूक केली. त्यासाठी आवश्यक असलेला खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला.

पोलीस आणि महापालिका यांच्यातील समन्वयाचा या अध्याय यापुढेही सुरू राहील याची काळजी महापालिका प्रशासनाकडून घेतली जात असून पोलिसांना वाढीव गस्तीसाठी आवश्यक असलेली वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव जयस्वाल यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांना आवश्यक असलेली वाहने वा त्यासाठीचा निधी राज्याच्या गृहखात्याकडून मिळणे अपेक्षित आहे. असे असताना महापालिकेने यासाठी पुढाकार घेऊन पोलिसांसाठी आता वाहन खरेदीही सुरू केली आहे.

ठाणे शहर परिसरात कायमस्वरूपी फिरती गस्त राहावी यासाठी पोलिसांना ३० बुलेट वाहने खरेदी करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे मांडला होता. या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देताना पहिल्या टप्प्यात रॉयल इनफिल्ड (३५० सीसी) या मॉडेलची १५ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. एक रॉयल इनफिल्ड बुलेट दुचाकीसाठी एक लाख ११ हजार ८१९ रुपयांचा दर मंजूर करण्यात आला असून यासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. दुसऱ्या टप्प्याची खरेदी नव्या आर्थिक वर्षांत करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:09 am

Web Title: thane municipal corporation thane police bike
Next Stories
1 ग्रामीण भागांत भाजपची वजाबाकी
2 नाताळनिमित्त वसईतील बाजारपेठा सजल्या
3 प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिका उदासीन
Just Now!
X