ठाणे महापालिकेकडून चार रोबोंची खरेदी; मुंबई महापालिकेचा प्रयोग राबविणार
कोटय़वधी रुपयांचा दौलतजादा करूनही ठाणे शहरातील नालेसफाईचा दरवर्षी उडणारा बोजवारा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने यंदाच्या वर्षी यंत्रमानवांचा वापर करून नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने हा प्रयोग यापूर्वी राबवून पाहिला असून गाळाने भरलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरत असल्याचा दावा केला जात आहे. हे लक्षात घेऊन नाल्यांची सफाई आणि कचऱ्याच्या विभक्तीकरणासाठी रोबो खरेदी केले जाणार असून, रस्त्यांच्या सफाईसाठीही यांत्रिक पद्धतीचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेमार्फत ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील मोठय़ा नाल्यांची सफाईची कामे वर्षांतून दोन वेळा केली जातात. शहरातील बहुतांश नाल्यांभोवती मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे तसेच झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे नाल्यांची सफाई होऊनदेखील पावसाळ्यापूर्वी याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कचरा आणि घाण दिसून येते. शहरातील काही नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी वर्षांनुवर्षे केल्या जात आहेत. साधारणपणे पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जावीत अशी अपेक्षा असते, मात्र पावसाळा सुरू होऊन काही महिने उलटले तरी नालेसफाईची कामे रडतखडत सुरूअसल्याची अनेक उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. ठाणे महापालिकेने गेल्यावर्षी नालेसफाईच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. तरीही अनेक नाल्यांमधील गाळाची सफाई प्रभावी पद्धतीने झाली नसल्याचे चित्र दिसून आले होते. ठाणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत ११७ किलोमीटर अंतरात एकूण ३०६ नाले असून या नाल्यांच्या कामांसाठी प्रभाग समितीनिहाय ६० हून अधिक ठेकेदार नेमले जातात. मुंब्य्रात ३१ किमीचे ९२ नाले आहेत, कळव्यात ९ किमीचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किमीचे ३७, वर्तकनगर १९ किमीचे २५, मानपाडा १७ किमीचे २६, नौपाडा साडेचार किमीचे २४, वागळे ८ किमीचे २०, उथळसर साडेसात किमीचे २४ आणि कोपरीत ४ किमीचे ११ नाले आहेत.
यापैकी काही नालेच मोठे असून लहान नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने होत नसल्याने मोठय़ा नाल्यांचे पाणी वाहून नेताना अडथळे उभे राहतात, असे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. काही ठिकाणी नाल्यांची सफाई करणे फारच किचकट ठरत आहे. त्यामुळे मोठय़ा नाल्यांची सफाई झाली तरी लहान नाल्यांच्या ठिकाणी मनुष्यबळ अथवा जेसीबी यंत्रणा जात नसल्याने या नाल्यांची सफाई रखडलेली असते. अशा नाल्यांची सफाई करण्यासाठी महापालिका रोबोटिक मशीन खरेदी करणार आहे. हे यंत्र स्वयंचलित असणार असून संगणकाद्वारे त्याची हाताळणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. या रोबोटिक यंत्रासाठी अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे नालेसफाई तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याची कामेही करणे शक्य होणार आहे.