पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमेकडे वसलेल्या नव्या ठाण्यासाठी हमरस्ता ठरलेल्या कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगर-शास्त्रीनगपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी घेतला.
पोखरण रस्ता क्रमांक एक अशी ओळख असणाऱ्या या मार्गालगत मोठय़ा संख्येने नागरी वसाहती उभ्या राहिल्या असून त्या तुलनेत हा रस्ता अरुंद ठरू लागल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. ही कोंडी सोडविण्यासाठी काही ठिकाणी खासगी विकासकांना विकास हस्तांतरण हक्क देऊन तर उर्वरित जागेवर महापालिकेच्या निधीतून रस्ता रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. नव्या ठाण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी या उद्देशाने ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दुपारी कॅडबरी नाक्यापासून पोखरण १ रस्त्याची पाहणी केली.  या पाहणीमध्ये त्यांनी रस्त्याचे चार टप्प्यांमध्ये रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शााळा, दुसऱ्या टप्प्यात सिंघानिया शाळा ते समतानगर, तिसऱ्या टप्प्यात समतानगर ते वर्तकनगर नाका आणि चौथ्या टप्प्यात वर्तकनगर नाका ते शास्त्रीनगर अशा चार टप्प्यांत या रस्त्याच्या रुंदीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे रस्ता रुंदीकरण करताना ज्या ठिकाणी विकासकांचे प्रकल्प आड येतील त्यांना अतिरिक्त विकास हस्तांतरण हक्क देऊन रस्ता रुंदीकरण करून घेण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. ज्या ठिकाणी विकासक नसेल त्या रस्त्याचे काम महापालिका निधीतून केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोखरण रस्ता क्रमांक एक येथे मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरील पुलांचे रुंदीकरण करण्यासंबंधी महापालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबतच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून पुलाच्या रुंदीकरणाची निविदा काढली जाणार आहे.