18 February 2019

News Flash

पालिकेच्या सायकली हद्दीतच!

सायकल सेवेचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांना पहिला अर्धा तास मोफत सेवा देण्यात येणार आहे

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

ठाण्याची वेस ओलांडताच सायकल बंद होण्याचे अनोखे तंत्र

ठाणेकरांना प्रवासाचा स्वस्त पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने आखलेल्या सायकल प्रकल्पातील सराव सफरींना अखेर प्रारंभ झाला असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर येत्या काही दिवसांतच नागरिकांना या प्रकल्पात भाडय़ाने मिळणाऱ्या  सायकलीवरून प्रवास करणे शक्य होणार आहे. ही सेवा सुरु करत असताना वेगवेगळ्या मुद्दयांची तांत्रिक तपासणी या सराव सफरीं दरम्यान केली जात असून भाडय़ाने उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या या सायकली ठाण्याच्या वेशीबाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्यास त्या तात्काळ बंद होण्याचे अनोखे तंत्र यानिमीत्ताने विकसीत केले जात आहे.

महापालिकेने जाहिर केलेल्या ५० सायकल स्थानकांपैकी विवियाना मॉल, कोरम मॉल, रेमंड कंपनी, माजिवडा, पोखरण रस्ता अशा ठिकठिकाणी २५ सायकल स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यानुसार नागरिकांसाठी सायकल उपलब्ध करून देण्यापूर्वी साईनपोस्ट इंडिया प्रा.लि. आणि न्यू एज मिडिया पार्टनर प्रा.लि. या कंपनीतर्फे शहरात सायकल सराव सफर सुरु आहे. विवियाना मॉल, कॉरम मॉल, माजिवडा, वर्तकनगर, पोखरण रोड या ठिकाणी ही सराव सफर सुरु आहे. स्थानकातून सायकल घेतल्यापासून शहरात सायकलचा कोणत्या ठिकाणी प्रवास होत आहे, कोणत्या परिसरात सायकल किती वेळ थांबली आहे, किती वेळाने सायकल स्थानकात आणून ठेवली जाते या सगळ्याचे निरीक्षण या सराव सफरीच्या दरम्यान केले जात आहे. यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून ही सर्व निरीक्षणे नोंदवण्यात येत आहेत. या सायकलींवर बसवण्यात येणाऱ्या जीपीएस यंत्रणेमुळे सायकलींच्या ठिकाणांची माहिती मिळण्यासाठी मदत होत आहे. सुरुवातीला १५० सायकली नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सायकलींचा उपयोग नागरिकांना संपूर्ण दिवसभर करता येणार असला तरी प्रत्येक अर्ध्या तासाला सायकलीचे शुल्क वाढणार असल्याने ही शुल्क रचना कशी असेल याविषयी उत्सुकता कायम आहे.

ठाणे महापालिका हद्दीबाहेर ही सायकल नेण्यास मनाई आहे. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केल्यास संबंधित व्यक्तीच्या मार्ग प्रवासाची माहिती कंट्रोल रुमला कळू शकेल अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कंट्रोल रुममधून तातडीने सायकल लॉक होण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

रात्रभर सायकल सेवा उपलब्ध?

दिवसभर सायकल उपलब्ध करून देण्यात येत असली तरी रात्री सायकल उपलब्ध होणार का याविषयी प्रकल्प मंडळाची चर्चा सुरू आहे. रात्रभर सायकल उपलब्ध करून दिल्यास गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने तूर्तास रात्री ही सेवा उपलब्ध नाही. मात्र सध्या सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिक सायकल सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत, असे प्रकल्प प्रमुखांकडून सांगण्यात आले.

पहिला अर्धा तास मोफत सेवा

सायकल सेवेचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांना पहिला अर्धा तास मोफत सेवा देण्यात येणार आहे. या सायकल सेवेचा अर्धा तास उपभोग घेतल्यावर त्यानंतर माफक दरात ग्राहकांना सायकल उपलब्ध होईल. मात्र संपूर्ण दिवस सायकल सेवेचा उपयोग करायचा असल्यास जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सायकलीची वैशिष्टय़े

* उंचीनुसार आसनव्यवस्थेत बदल करण्याची सुविधा.

* सायकलीचे हॅण्डल फिरवताच रिंग वाजणार.

* सामान ठेवण्यासाठी विशेष जागा.

* दोन्ही चाकांना ‘डिस्क ब्रेक’.

* टय़ुब नसलेल्या चाकांमुळे पंक्चरची शक्यता नाही.

First Published on February 13, 2018 2:17 am

Web Title: thane municipal corporation to provide bicycles on rent