२६ जानेवारीच्या मुहूर्तावर १६ नागरी सुविधा ऑनलाइन
ठाणे महापालिकेतील विविध विभागांच्या दाखल्यांसाठी ठाणेकरांना खेटे घालावे लागू नये तसेच त्यांचा वेळ आणि पैशांची बचत व्हावी या उद्देशातून महापालिका प्रशासनाने ऑनलाइन सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या २६ जानेवारीच्या मुहूर्तावर महापालिकेच्या तब्बल १६ सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. या सेवेमुळे ठाणेकरांना आता घरबसल्या दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागरिकांना ठरावीक मुदतीत विविध विभागांचे दाखले मिळावेत म्हणून राज्य शासनाने सेवा हमी कायदा लागू केला आहे. त्यानुसार १६ सेवांसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी या १६ सेवांचे ऑनलाइनद्वारे दाखले देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या योजनेसाठी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर एक दालन उभारण्यात येणार आहे. तसेच येत्या २६ जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संजय निपाणी आणि संगणक विभागाचे प्रमुख स्वरूप कुलकर्णी यांनी शुक्रवारी या दालनाची पाहणी केली.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या दाखल्यांसाठी ठाणेकरांना महापालिका मुख्यालय तसेच विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. या दाखल्यांसाठी अर्ज करण्यापासून ते दाखले हातात मिळेपर्यंत संबंधित विभागात सातत्याने खेटे घालावे लागत होते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो आणि पैसाही खर्च होतो. परंतु, ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांना आता मुख्यालय तसेच विविध कार्यालयात दाखल्यांसाठी हेलपाटे घालावे लागणार नाहीत. या योजनेनुसार जन्म, मृत्यू, मालमत्ता कर, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण दाखला, विभागीय दाखला, जोता, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, मलवाहिनी जोडणी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आदी महत्त्वाचे दाखले नागरिकांना देण्याची तयारी महापालिकेकडून केली जात आहे. येत्या २६ जानेवारीपासून ही सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिकेने पक्का केल्याने नागरिकांना आता या विभागांचे दाखले घरबसल्या मिळणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.