News Flash

ठाणे पालिकेची शून्य कोविड मोहीम

संशयित रुग्णांची प्रतिजन संचाद्वारे चाचणी

साथीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांची ताप तपासणी; संशयित रुग्णांची प्रतिजन संचाद्वारे चाचणी

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे ‘विषाणूकेंद्र’ बनत असलेल्या ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’ राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभाग समिती स्तरावर नागरिकांची ताप तपासणी करून त्यातील संशयित रुग्णांची शीघ्र प्रतिजन चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे करोना रुग्णांचा शोध त्वरेने घेणे शक्य होणार असून त्याद्वारे आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरात दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन चाचण्या वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने करोना चाचण्यांची संख्या ८४६ वरून १ हजार १३५ इतकी केली आहे. प्रशासनाने आता १ लाख प्रतिजन चाचणी संच (रॅपिड अ‍ॅन्टिजन किट) खरेदी केले असून त्याद्वारे संपूर्ण शहरात शून्य कोवीड मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आला.

मोहीम अशी..

’ ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यामध्ये विविध पथकांमार्फत घरोघरी ताप तपासणी करण्यात येणार आहे.

’ प्रभाग समिती स्तरावर केल्या जाणाऱ्या ताप तपासणीत एखाद्या रुग्णामध्ये करोनाची लक्षणे किंवा ऑक्सिजन प्रमाण कमी आढळून आले, तर त्या व्यक्तीला तात्काळ जवळच्या केंद्रावर पाठवून तिथे त्याची रॅपिड अ‍ॅन्टिजन किटद्वारे चाचणी केली जाणार आहे.

’ त्याचा अहवाल अर्ध्या तासात प्राप्त होणार आहे. यामुळे संबंधित रुग्णांना तात्काळ उपचार देऊन त्याचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे.

’ त्याच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करून परिसरातील करोना प्रादुर्भाव रोखला जाणार आहे, असे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

नवीन तपासणी केंद्रे

शीघ्र प्रतिजन संचाच्या माध्यमातून नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेची गरज नसून त्यासाठी महापालिकेने वर्तकनगर, कळवा, टेंभीनाका आणि मानपाडा या भागांत नवीन तपासणी केंद्रे उभारली आहेत. या मोहिमेत प्रतिजन संचाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांचा शोध घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:42 am

Web Title: thane municipal corporation zero covid campaign zws 70
Next Stories
1 प्रदूषण नियंत्रण मंडळाची ‘कडोंमपा’ला नोटीस
2 उच्चभ्रूंच्या वस्तीत करोनाचा फैलाव
3 रुग्णशोध मोहिमेचा फज्जा
Just Now!
X