01 March 2021

News Flash

ठाण्यातील पालिकेची वृक्ष लागवड वादात

ठाणे महापालिकेने नुकत्याच आखलेल्या प्रस्तावानुसार बोरिवडे गावात वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

लागवडीच्या खर्चात प्रत्येक वृक्षामागे ६६७ रुपयांची वाढ; भलत्याच ठिकाणी वृक्षारोपण

सुगंधी वृक्ष लागवडीसंबंधी झालेल्या आरोपामुळे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचा कारभार संशयात सापडला असतानाच पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या खर्चातही तब्बल ६४ टक्क्यांची वाढ झाल्याने नवीन वाद उद्भवला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक झाडामागे सरासरी १२३३ रुपये खर्च करणाऱ्या पालिकेने यंदा १९०० रुपये खर्च केला आहे. दुसरीकडे, बोरिवडे भागात सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याचे प्रस्तावात नमूद करणाऱ्या पालिकेने प्रत्यक्षात शहरातील गावंडबाग परिसरात २५ हजार वनस्पतींची लागवड केली आहे. यावरूनही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ठाणे महापालिकेने महाराष्ट्र वन विकास महामंडळ यांच्यामार्फत डायघर, कौसा, शीळ, मुंब्रा आणि इलठण येथे तीन लाख वृक्षांची लागवड केली आहे. महापालिकेने साधारण तीन वर्षांपूर्वी पाच लाख वृक्ष लागवडीची घोषणा केली होती. त्यानुसार तीन लाख वृक्षांच्या लागवडीसाठी १३ कोटी तर वृक्षाच्या देखभालीसाठी २४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. महापालिकेने नुकत्याच आखलेल्या एका प्रस्तावानुसार एक लाख वृक्ष लागवड आणि पाच वर्षे निगा व देखभालीसाठी ९ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च ठरविण्यात आला आहे. हा खर्च साधारणपणे ५० हजार झाडांवर केला जाणार आहे. मागील तीन वर्षांत महापालिकेने जे ३७ कोटी खर्च केले त्यानुसार प्रत्येक झाडामागे सरासरी १२३३ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. असे असताना यंदा जेमतेम ५० हजार वृक्षांची लागवड आणि देखभालीसाठी १९०० रुपयांवर खर्च गेल्याने या प्रकरणात संशयाचे धुके गडद बनू लागले आहे.

ठाणे महापालिकेने नुकत्याच आखलेल्या प्रस्तावानुसार बोरिवडे गावात वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात या ठिकाणी वृक्ष लागवड झालेलीच नाही. याच ठिकाणी एक लाख नव्हे तर ही ५० हजारांची लागवड आणि पाच वर्षे देखभाल-निगेसाठी तब्बल ९ कोटी ३४ लाख रुपये खर्च होणार आहेत. स्थायी समितीची मंजुरी नसतानाही कामाला बेधडक सुरुवात झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेल्या ५-२-२ या कलमाचा आधार घेत हा वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून शुक्रवारी स्थायी समितीत या मुद्दय़ावरून नगरसेवकांनी प्रशासनाला लक्ष्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:52 am

Web Title: thane municipal council planting plantation in dispute
Next Stories
1 शॉर्ट्स, धोतीच्या पेहरावात मनमोकळा दांडिया!
2 गतवर्षीच्या पीकविम्याची प्रतीक्षा!
3 औद्योगिक वसाहतीत पथदिव्यांखाली अंधार
Just Now!
X