पावसाळ्यात सतर्कतेचा ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा इशारा

यंदाच्या पावसाळ्यात पुढील चार महिन्यात १७८ वेळा ठाण्याच्या खाडीत चार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आली. या कालावधीत ठाणेकरांनी सावधान राहावे तसेच खाडीकिनारी राहणाऱ्या कुटुंबांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी झाले होते. यंदा मात्र हवामान विभागामार्फत सरासरीपेक्षा जास्त पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. पावसाचे अधिकचे प्रमाण लक्षात घेता महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची जय्यत तयारी सुरू केली असून आराखडाही तयार केला आहे. तसेच महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाळीने रस्त्यावर उतरून काम करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान ठाणे परिसरात भरती आणि ओहोटीचे वेळापत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केले आहे. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती ७ जून रोजी होती. मात्र, पाऊस नसल्याने तिचा परिणाम सखल भागात फारसा जाणवला नाही. आपत्कालीन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार येत्या १०६ दिवसात खाडीला १७८ वेळा उधाण येणार असून या कालावधीत ४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील किंवा खाडीच्या भरतीचे प्रमाण वाढणार आहे, असा अंदाज आहे.

या तारखांना खाडीकिनाऱ्यावरा धोकादायक

चार महिन्यात १७ वेळा भरतीच्या लाटा पाच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असतील. २० जुलै रोजी दुपारी १ वाजता ५.०१ मीटर उंच, २१ जुलै रोजी ५.१४, २२ तारखेला ५.१८, २३ तारखेला ५.१५, आणि २४ तारखेला ५.०३ मीटर उंचीची भरती येणार आहे. तर २ ऑगस्ट रोजी ५.१३, ५ तारखेला ५.०७, १८ तारखेला ५.०८, १९ तारखेला ५.२४, २० तारखेला ५.३०, २१ तारखेला ५.२४, २२ तारेखला ५.०८, आणि सप्टेंबर महिन्यात १८ तारखेला ५.२९, १९ तारखेला ५.२०, २० तारखेला ५.०६ मीटर उंचीची भरती येणार आहे.

महिना          दिवस           वेळ    

जून             २८             ४५

जुलै             २७             ४६

ऑगस्ट          २५             ४३

सप्टेंबर          २६              ४३

सप्टेंबर महिन्याच्या ४ तारखेला रात्री १.४५ वाजता, सकाळी ७.४५ आणि दुपारी १.५५ वाजता तीन वेळा खाडीला उधाण येणार आहे.