उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर, उपमहापौरांची मिरवणूक

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील दहा महापालिकांच्या निकालातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढून ठाण्यात आपली सत्ता अबाधित ठेवणाऱ्या शिवसेनेने सोमवारी महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत यश मिळवताच विजयोत्सव साजरा केला. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, परिसरात भगवे झेंडे-पताकांची आरास, ढोल-ताशांची पथके, रांगोळ्या अशा वातावरणात पक्षाने मिरवणूक काढत ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या सोहळय़ासाठी उपस्थित राहिल्याने सेनानेते व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे दिसत होते.

ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची औपचारिकता सोमवारी उरकण्यात आली. यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरभर विजयी मिरवणूक काढली. महापालिका निवडणुकीतील विजयानंतरही शिवसेनेने ठाण्यात विजयोत्सव साजरा केला नव्हता. महापौर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रविवारपासूनच शिवसेनेच्या गोटात जल्लोषाची तयारी सुरू झाली होती. पाचपाखाडी परिसरातील महापालिका मुख्यालय परिसरात भगव्या झेंडय़ांची आरास उभारण्यात आली होती. मुंबई-नाशिक महामार्गावर मोठे फलक आणि झेंडे लावून शिवसेनेने वातावरणनिर्मिती केली होती. याशिवाय, महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सिंहासनावरील शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारण्यात आला होता. त्याच परिसरात हत्तीचे पुतळे उभारण्यात आले होते. तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण मुख्यालय परिसरात सुरक्षारक्षकांचे कडे उभारण्यात आले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार असल्याने या ठिकाणी नगरसेवक आणि अधिकारी आणि पत्रकार यांच्याव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता. या सभागृहाच्या दिशेने येणारे प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते.

ठाणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १०.३० वाजता महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार असल्यामुळे राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात आले. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे निवडणूक वेळेत सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सुरू होत असतानाच शिवसेनेचे नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहात दाखल झाल्या. या सर्वानी भगवे फेटे परिधान केले होते. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार व खासदार सभागृहात उपस्थित होते.

शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची महापौर तर रमाकांत मढवी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी करताच सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू झाला. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृहात येऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मुख्यालयातील आवारात उद्धव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर काही काळ ते विजयोत्सव मिरवणुकीतही सहभागी झाले.