शिवसेनेचा फडणवीस यांना धक्का?

ठाणे : ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन खाती तसेच विविध योजनांची खासगी बँकेतील खाती शासकीय बँकांमध्ये वळविण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने गुरुवारी घेतला.

महापालिकेच्या योजनांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत असून या बँकेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता उच्च पदावर आहेत. त्यामुळे  खाती वळविण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने फडणवीस यांना एकप्रकारे धक्का दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

तत्कालिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्यामुळेच पोलीसांची वेतन खाती आणि अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप होत आहे. सत्तापालटानंतर  पोलिसांची  अ‍ॅक्सिस बँकेतील वेतन खाती पुन्हा भारतीय स्टेट बँकेत वळविण्याचा निर्णय शिवसेना घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन खाती शासकीय बँकांमध्ये वळविण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने गुरुवारी घेतला. तशाप्रकारचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.  दरम्यान, खासगी बँका बुडल्या तर महापालिकेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच महापालिकेची खासगी बँकेतील खाती शासकीय बँकेत वळविण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर म्हस्के यांनी स्पष्ट केले.