डिजिटल फलक उभारण्यास सुरुवात; अ‍ॅपद्वारेही बसची वेळ समजणार

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बसगाडय़ांच्या येण्याची वेळ प्रवाशांना माहीत व्हावी यासाठी उपक्रमाने थांब्यावर डिजिटल फलक उभारण्यास सुरुवात केली आहे. तसेच उपक्रमाचे जुने मोबाइल अ‍ॅप बंद करून नव्याने ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ हे नवीन अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे अपेक्षित बस सध्या कोणत्या ठिकाणी आहे व तिला थांब्यावर पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहितीही प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाकडून डिजिटल इंडिया उपक्रम राबविला जात असून त्या माध्यमातून महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे परिवहन उपक्रमाने बस थांब्यांवर डिजिटल फलक बसविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी टीएमटी प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. बस थांब्यावर कोणत्या क्रमांकाची तसेच कोठे जाणारी बस येईल आणि किती वेळात पोहोचेल यासंबंधीची माहिती डिजिटल फलकावर प्रदर्शित करण्यासाठी चाचपणी सुरू होती. या चाचपणीनंतर टीएमटी प्रशासनाने आता शहरातील थांब्यांवर डिजिटल फलक बसविले असून त्याद्वारे थांब्यावरील प्रवाशांना रेल्वेच्या धर्तीवर बसगाडय़ांच्या वेळापत्रकाची माहिती मिळत आहे.

डिजिटल फलकाच्या योजनेंतर्गतच   ‘व्हेअर इज माय बस’ हा मोबाइल अ‍ॅप काही वर्षांपुर्वी सुरू केला होता. या अ‍ॅपमधील काही तांत्रिक होत्या. बसगाडय़ांच्या वेळा आणि त्यांच्या मार्गाची माहिती मानवी पद्धतीने नोंदविली जात होती.  नियंत्रण कक्षाला माहिती उपलब्ध झाल्यानंतर नोंद केली जात होती. त्यामुळे बसचा थांब्यावर येण्याचा प्रत्यक्ष कालावधी ठाणेकरांना कळत नव्हता. अखेर  हे अ‍ॅप बंद करून ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ हे नवीन अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामध्ये बसगाडय़ांच्या मार्गाची नोंद केली तर त्याद्वारे बस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे आणि किती वेळात ती थांब्यावर पोहोचेल याची अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.

अ‍ॅप कसे मिळवाल?

टीएमटीच्या बस थांब्यांवर बसविण्यात आलेल्या डिजिटल फलकावर क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करताच प्रवाशांना ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ या अ‍ॅपची डाऊनलोड लिंक उपलब्ध होईल. मोबाइलमधील प्ले स्टोअरवरूनही हे अ‍ॅप थेट डाऊनलोड करता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५० थांब्यांवर डिजिटल फलक बसविण्यात आले असून लवकरच उर्वरित ६० थांब्यांवर असे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ अ‍ॅपमुळे नागरिकांना मोबाइलद्वारे थांब्यावर येणाऱ्या बसचा प्रत्यक्ष कालावधी समजू शकणार आहे.

– संदीप माळवी, व्यवस्थापक, टीएमटी

चालक, वाहकांवरही लक्ष

ठाणे महापालिका क्षेत्रातील ९८ मार्गावर ३१० बसगाडय़ा चालविण्यात येत असून शहरात एकूण ४५० बस थांबे आहेत. बसगाडय़ांवर बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेद्वारे ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ या अ‍ॅपमध्ये बसगाडय़ांची माहिती आपोआपोच नोंदविली जाणार आहे. त्यामुळे बसगाडय़ांचा प्रत्यक्ष कालावधी समजणार असून त्याचबरोबर कोणत्या मार्गावर बसच्या किती फेऱ्या होतात आणि कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात, याची माहिती परिवहन प्रशासनाला कळणार आहे.