सहा वाहकांवर निलंबनाची कारवाई
ठाणे परिवहन उपक्रमातील वाहकांच्या फसवेगिरीमुळे प्रवाशांना दुबार तिकीट काढावी लागू नये, तसेच तिकटाव्यतिरिक्त उर्वरित पैसे प्रवाशांना पुन्हा मिळावेत, यासाठी परिवहन प्रशासनाने वाहकांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक तयार केले आहे. हे पथक बसमध्ये वाहकांची झाडाझडती घेत आहे. यामध्ये प्राथमिक दोषी आढळलेल्या सहा वाहकांवर परिवहन प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
परिवहन सेवेत सद्य:स्थितीमध्ये २३०० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ७७३ चालक, तर ९५५ वाहक आहेत. तरीही परिवहनला आजही १८० चालक तर १५५ वाहकांची गरज आहे. असे असतानाच शहरातील प्रवाशांकडून बसमधील वाहकांविरोधात तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर परिवहन प्रशासनाने भरारी पथक तयार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पथक अचानकपणे बसमध्ये येऊन बसते आणि वाहकाकडील तिकीटांचा हिशोब घेते. यामध्ये वाहकाकडे दैनंदिन उपलब्ध तिकीटापेक्षा जास्त किंवा कमी रक्कम आढळून आली तर भरारी पथक त्यांची रितसर चौकशी करून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविते. त्याआधारे अशा वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये भरारी पथकामार्फत सुरु असलेल्या झाडाझडतीमध्ये सहा वाहक सापडले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू केली आहे. या वृत्तास परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची तपासणी सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट केले.

प्रवाशांच्या तक्रारी..
काही वाहकांना तिकिटांचे पैसे देऊनही तिकीट दिले जात नाही. तसेच वाहकाकडे तिकिटाची मागणी केली तर पैसे दिले नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. यामुळे प्रवासाकरिता पुन्हा तिकीट काढावे लागते. त्याचप्रमाणे तिकिटाच्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित पैसे वाहकाने परत करणे अपेक्षित असते, मात्र अनेक वाहक पैसे परत करत नाहीत. याशिवाय काही चालक उद्धटपणे वागतात.