04 July 2020

News Flash

जागतिक पर्यावरणदिनी पालिका वृक्ष प्राधिकरण संपर्काबाहेर 

वृक्ष संवर्धनाची दोन वर्षे अंमलबजावणीविनाच

प्रतिनिधिक छायाचित्र

वृक्ष संवर्धनाची दोन वर्षे अंमलबजावणीविनाच

किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना घडत असून अशा घटना रोखण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महापालिकेने एक समिती स्थापन केली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून पालिकेला चार महिन्यांत अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल देऊन दोन वर्षांचा काळ लोटला तरी पालिका प्रशासनाकडून नौपाडय़ाचा काही भाग वगळता त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे समितीने सुचविलेल्या अहवालातील उपाययोजना कागदावरच असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना घडतात. या वृक्षांभोवती सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे ते उन्मळून पडत असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. जुलै २०१७ मध्ये अशाच प्रकारे एक वृक्ष वकील किशोर पवार यांच्या अंगावर पडला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टीका झाली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये एक समिती स्थापन केली होती. या समितीने ३१ मार्च २०१८ मध्ये एक अहवाल तयार करून वृक्ष पडण्याची कारणे आणि उपाययोजनासंबंधीचा अहवाल तयार केला होता. सिमेंट काँक्रीटीकरण, झाडांच्या मुळांची वाढ खुंटणे, अशास्त्रीय पद्धतीने झाडांची कापणी यामुळे ही झाडे पडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.

उपाययोजना अशा..

* रस्त्याचे रुंदीकरण तसेच पदपथ बांधताना त्यालगत असलेल्या झाडांना चौकोनाकृती घेर तयार करणे

* रस्ता आणि मलनिस्सारण वाहिनीमध्ये अंतर ठेवावे. त्यामुळे झाडांच्या मुळांना वाढण्यास जागा मिळेल

* रस्त्याकडेला वृक्षारोपण करताना दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवणे

* झाडाचे पुनरेपण करताना त्याला यांत्रिक पद्धतीने कापू नये. त्याला जमिनीपासून अलगद वेगळे करून पुनरेपण करावे

* झाडाची छाटणी करताना ४० फूट उंचीपेक्षा उंच झाडांचा शेंडा छाटण्यात यावा, जेणेकरून वादळात तोल जाऊन हे झाड कोसळणार नाही.

ठाण्यात दरवर्षी शेकडो झाडे उन्मळून पडतात. महापालिकेकडून रस्त्याचे होणारे काँक्रीटीकरण तसेच या झाडांची देखभाल होत नसल्याने असे प्रकार घडत आहे. बुधवारीही पहिल्याच पावसात मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळली आहेत. महापालिकेने समिती करून उपाययोजनाही सुचविल्या होत्या. मात्र, नौपाडय़ाचा काही भाग वगळता अन्य ठिकाणी उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. तसेच याबाबत महापालिका आयुक्तांना आम्ही पत्रही पाठविले आहे.

– रोहित जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 4:13 am

Web Title: thane municipal tree authority world environment day zws 70
Next Stories
1 ठाण्यात वादळ‘वाट’
2 वादळानंतर जिल्ह्य़ात पावसाची रिपरिप
3 अंबरनाथच्या युवांचा गोरगरिबांना आधार
Just Now!
X