24 November 2020

News Flash

परवानगी नसतानाही पालिकेची कामे

बाळकूम खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्प वादात

बाळकूम खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्प वादात

ठाणे : बाळकूम येथील साकेत भागात ठाणे महापालिकेकडून स्मार्टसिटी अंतर्गत खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्प (वाटर फ्रंट) उभारण्यात येत आहे. त्यासाठी परवानगी न घेताच प्रशासनाने काम सुरू केले आहे आणि मोठय़ा प्रमाणात खारफुटीची कत्तल केली असल्याचे एका पंचनाम्यात उघड झाल्याने  हा प्रकल्प आता पुन्हा एकदा वादात अडकला आहे.

ठाणे महापालिकेकडून शहरात खाडीकिनारी सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार बाळकूम-साकेत मार्गावर असलेल्या खाडीकिनारी भागात या प्रकल्पाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटींवर भराव टाकून ही कामे केली जात असल्याचा आरोप वर्षभरापूर्वी बाळकूम ग्रामस्थ आणि पर्यावरणवादी संघटनांनी केला होता. त्यासंदर्भातील काही तक्रारीही जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसीलदारांनी या ठिकाणी पाहणी केली होती. तसेच पंचनाम्यात पुढील सूचना मिळेपर्यंत काम थांबविण्यास सांगितले होते. असे असतानाही महापालिकेचे काम  सुरूच आहे.

सध्या या खाडीकिनारी जेसीबीद्वारे भराव टाकून सपाटीकरणाचे काम सुरू झालेले आहे. नियमानुसार खाडीकिनारी ५० मीटरपर्यंत कोणतेही काम केले जाऊ शकत नाही. या संदर्भातील तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे गेल्यानंतर सोमवारी ग्रामस्थ, पोलीस आणि महापालिका अभियंत्यांच्या उपस्थितीत नायब तहसीदार मनोज सुर्वे यांनी या ठिकाणच्या कामाची  पाहणी केली. केलेल्या पंचनाम्यात परवानग्या नसतानाही महापालिकेने कामे सुरूच ठेवल्याचे तसेच या ठिकाणी खारफुटींची कत्तल झाल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या उपअभियंत्याला विचारले असता, त्यांनी ही कामे परवानगी घेऊनच केलेली आहेत, असा दावा केला. या परवानग्यांच्या प्रती आम्ही तहसीलदारांकडे सादर करणार आहोत. खाडीकिनारी विकास झाल्यास ठाणेकरांना त्याचा लाभ मिळणार असून परिसरात हिरवळ राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तर नायब तहसीलदार मनोज सुर्वे यांना विचारले असता, महापालिकेने परवानग्या सादर केल्यानंतर तो अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान,या जागेत दोन वेळा पंचनामे झालेले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. खाडीकिनारी भराव टाकून काम सुरू असल्याचे प्रत्यक्ष दिसत असतानाही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही.  याचे आश्चर्य वाटते, असे ग्रामस्थ गिरीश साळगावकर यांनी सांगितले.

खारफुटीची कत्तल

बाळकूम जलवाहिनी येथे खारफुटीची बेसुमार कत्तल झाल्याची तक्रार म्युज फाऊंडेशनने जिल्हा प्रशासनाला केली होती. सोमवारी सकाळी या जागेची पाहणी जिल्हाप्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी या ठिकाणी खारफुटींची कत्तल झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र पाच मिनिटांतच अधिकारी पाहणी करून निघून गेल्याने पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:58 am

Web Title: thane municipal works continue without permission zws 70
Next Stories
1 भाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार?
2 अंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात
3 हातगाडय़ांमुळे वाहतूक कोंडी
Just Now!
X