१४९ मंडळे उत्सव साजरा करणार नाहीत;  करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ठाणे : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरातील १४९ मंडळे उत्सव साजरा करणार नाहीत. दरवर्षी शहरात २५० मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो आणि त्यासाठी महापालिकेकडून त्यांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात येते. मात्र यंदा करोना विषाणू संसर्गामुळे शहरातील केवळ १०१ मंडळांनी परवानगी घेतली आहे, तर उर्वरित १४९ म्हणजेच ६० टक्के  मंडळांनी उत्सवातून माघार घेतल्याचे चित्र आहे.

करोना संसर्ग वाढू नये म्हणून आतापर्यंतचे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. दहीहंडी आणि गणेशोत्सवामध्ये नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि यातूनच करोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे या उत्सवासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने नियमावली आखून दिली होती. असे असले तरी अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर, काही मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा केला. नवरात्रोत्सवात नागरिक एकत्र येऊन गरबा खेळतात. यातूनही करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा गरबा खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी या उत्सवातून माघार घेतली आहे, तर काही मंडळे साधेपणाने हा उत्सव साजरा करणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या मंडपाकरिता मंडळांना महापालिकेची परवानगी तसेच पोलीस, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. दरवर्षी ठाणे शहरातील २५० मंडळे नवरात्रोत्सवाच्या मंडपांसाठी महापालिकेकडे अर्ज करतात आणि त्यांना महापालिकेकडून परवानगी देते. त्याचबरोबर काही नियमांचे पालन करण्याचे आदेशही देते. परंतु यंदाच्या वर्षी केवळ १०१ मंडळांनी मंडपासाठी परवानगी मागितली आहे.

ज्या मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा लागणार आहे. त्यामध्ये मूर्तीच्या उंचीची मर्यादा, गरबा खेळण्यास बंदी, गर्दी टाळणे यांचाही सामावेश आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते. – अशोक बुरपल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका