पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप; शिवसेनेचेही राष्ट्रवादीला तिखट शब्दांत प्रत्युत्तर

ठाणे : शिवसेना नेते व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेवून शांत बसले आहेत आणि त्याचा त्रास नाहक  ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बुधवारी दोन्ही पक्षांतील नव्या कलहाला तोंड फोडले. शिवसेनेनेही ‘रस्त्यावर उतरलात तर पालकमंत्र्यांचे काम दिसेल’ अशा शब्दांत परांजपे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात एकत्रितपणे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदाच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली ही हमरीतुमरी लक्षवेधी ठरत आहे. ‘ठाणे शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरू आहे. कोविड कक्षातील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात येईल. त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरीबांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठाणे पालिकेने रुग्णालयातील बिलांसाठी लेखापरीक्षक नेमण्याची घोषणा केली असली तरी अनामत रक्कम घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, अशी टीका आनंद परांजपे यांनी बुधवारी केली. प्रशासनावर हल्ला चढवत असतानाच त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चिमटा काढला. ‘ग्लोबल हब येथे वैद्यकीय अधिकारी मृत रुग्णाला बेपत्ता दाखवत आहेत आणि पालकमंत्र्यांना प्रशासनाकडून चुकीची माहिती दिली जात आहे.  त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केले तरच या शहरातील महामारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुजोरी संपुष्टात येईल,’ असे ते म्हणाले. परांजपे यांच्या या विधानामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या मुद्दय़ावर परांजपे यांच्यावर हल्ला चढवला. ‘पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोवीड रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही,’असे म्हस्के म्हणाले. ‘त्यांच्या पक्षाचे ८० वर्षांचे प्रमुख प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, करोनाची बाधा झालेले अनेक मंत्री आणि नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले. पण तरुण नेतृत्व म्हणवणाऱ्या ठाण्यातल्या नेत्यांचे नखही ठाणेकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही,’ असा टोलाही म्हस्के यांनी लगावला.