हणमंत जगदाळे यांची राजीनाम्यानंतर स्वपक्षीयांवर टीका

ठाणे : ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची तोफ डागत गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीला ठाण्यातही फुटीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील बडे राजकीय प्रस्थ अशी जगदाळे यांची ओळख असून येत्या काळात त्यांचा प्रवास भाजपच्या दिशेने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे ठाण्यातील नेतेही त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे हे पक्षातील अंतर्गत वादामुळे अस्वस्थ असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. असे असताना गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष कमकुवत होत असल्याची टीका करत त्यांनी हा राजीनामा दिला. तूर्तास आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेतील विविध निर्णय घेताना विरोधी पक्षनेत्याकडून पक्षातील नगरसेवक आणि गटनेत्यांना विश्वासात घेतले जात होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही परंपराच मोडीत काढून व्यक्तिकेंद्रित महापालिकेतील कामकाज चालविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असा आरोप जगदाळे यांनी मिलिंद पाटील यांच्यावर केला. ठाणे शहरामध्ये मंजूर करण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेत आमच्या संपूर्ण प्रभागाचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्या ठरावात बदल करून त्यातून शास्त्रीनगर विभाग वगळण्यात आला. या ठरावावर विरोधी पक्षनेत्यांनी स्वाक्षरी केली असून त्यामुळे प्रभागात काम करणे कठीण झाले आहे, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेत्यांचा प्रतिहल्ला

ठाणे महापालिकेत प्रशासनाविरोधात भूमिका घेतली, त्या वेळेस कोणी तरी डोळे वटारले किंवा कुणाची चिठ्ठी आली की जगदाळे सभागृहाबाहेर निघून जायचे. नगरसेवक बैठकीतील भूमिकेत बदल केला जात होता तर त्यावर ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांनी आवाज का उठविला नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिले.