News Flash

नव्या मेट्रो मार्गाचे स्वप्न धूसरच

मुंबईबाहेरील शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीस जोमाने सुरुवात केली आहे.

|| जयेश सामंत

जुन्याच प्रकल्पांना बळ देण्याचा ‘एमएमआरडीए’चा निर्णय

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पांच्या बांधकामात निधीचा अडथळा उभा राहू नये यासाठी महानगर प्राधिकरणाने यंदाच्या आर्थिक वर्षात या प्रकल्पांसाठी ४,५७१ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद केली असली तरी करोनाकाळात आलेल्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन नव्या मेट्रो प्रकल्पांसाठी हात आखडता घेतला असल्याचे चित्र आहे.

वडाळा-ठाणे-गायमुख तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेसाठी एकत्रित अशी १४०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करणाऱ्या प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली-तळोजा आणि कांजूर-बदलापूर या मार्गावरील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी जेमतेम २२ कोटी रुपयांची तरतूद केल्याने यंदाही हे प्रकल्प कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या शहरांमध्ये मेट्रो घोषणेचे वारे जोमाने वाहत असले तरी या मार्गासाठी जेमतेम पावणेदोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने या प्रकल्पालाही यंदाच्या वर्षात मुहूर्त मिळणार नाही हे स्पष्टच आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे जाळे बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मुंबई तसेच मुंबईबाहेरील शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीस जोमाने सुरुवात केली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीस करोनामुळे सर्वत्र टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे या प्रकल्पांच्या कामावर परिणाम झाला. टाळेबंदीमुळे मजूर परराज्यात गेल्याने बराच काळ ही कामे बंद होती. राज्य सरकारने टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मजूर परतले आणि या कामांनीही जोर धरला. टाळेबंदीमुळे लांबलेल्या या कामांना यंदाच्या वर्षात वेग मिळावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ४५७१ कोटी रुपयांचे घसघशीत आर्थिक बळ या प्रकल्पांमागे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील दहिसर-चारकोप-मानखुर्द (७०० कोटी ६५ लाख), डी. एन. नगर ते मंडाळे (४७३ कोटी), कुलाबा-वांद्र्रे-सीप्झ (२५० कोटी), स्वामी समर्थ नगर-सीप्झ-कांजूरमार्ग (४०० कोटी), अंधेरी पूर्व ते दहिसर (९९९ कोटी), दहिसर ते मीरा-भाईंदर (३२० कोटी) अशा सर्वच प्रमुख मेट्रो मार्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हे करत असताना ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असणारा वडाळा-घाटकोपर-ठाणे या मार्गिकेसाठी ८९० कोटी तर कासारवडवली ते गायमुख या विस्तारित मार्गिकेसाठी १७६ कोटी रुपयांचा खर्च यंदाच्या वर्षात करण्याचे नियोजन आहे. याशिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पावर ३१८ कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले असून या निधीच्या नियोजनामुळे या प्रकल्पांची कामे पुरेशा वेगाने सुरू राहतील, असा दावा प्राधिकरणामार्फत केला जात आहे.

कागदावरील प्रकल्पांसाठी हात आखडता

  •  जुन्या आणि बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांना बाधा येऊ नये यासाठी भरीव तरतूद करणाऱ्या प्राधिकरणाने पुढील वर्षात कागदावर असलेल्या प्रकल्पांसाठी मात्र हात आखडता घेतला आहे.
  • राज्य सरकारच्या आदेशानुसार एमएमआरडीएने गेल्या काही वर्षात कल्याण-डोंबिवली-तळोजा तसेच घोडबंदर-विरार मुंबईबाहेरील दोन नव्या मार्गिकांची आखणी केली आहे. याशिवाय कांजूर ते बदलापूर जलद वाहतूक मार्गाचा विचार केला जात आहे.
  • या मार्गावरही मेट्रोची आखणी असेल अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी ही मार्गिका कोणत्या प्रकारची असेल यावर अभ्यास सुरू आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गिकेसाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे आग्रही असून विरार मेट्रोची हवाही यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापवली जात आहे.
  •  प्रत्यक्षात मात्र या दोन्ही प्रकल्पांसाठी फारशी तरतूद करण्यात आलेली नाही. कल्याण- तळोजा मार्गिकेसाठी १२ कोटी तर कांजूर-बदलापूर जलद मार्गासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ठेवणची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
  •  विरार मेट्रोसाठी तर एक कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली असून हे आकडे पाहाता यंदाच्या वर्षी या प्रकल्पांना मुहूर्त मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:03 am

Web Title: thane new metro dream project mmrda akp 94
Next Stories
1 रेल्वे स्थानकात घुसखोरी करणारे रिक्षाचालक गायब
2 पोलीस वसाहतीतील इमारतींना गळती
3 ठाण्यात करोना रुग्णदुपटीच्या वेगात वाढ
Just Now!
X