ठाणे : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या बंदमुळे ठाण्यातून मुंबई परिसरात जाण्यासाठी बेस्ट सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ठाण्यातील बाळकुम, माजीवाडा, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, मुलूंड चेक नाका, लोकमान्य नगर आणि ठाणे पूर्व या भागांतील बेस्ट थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अखेर अनेक प्रवाशांनी ओला, उबर या खासगी टॅक्सी वाहतुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी झाली.

ठाणे शहराच्या विविध भागांतून शीव, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलूंड या भागात जाण्यासाठी बेस्ट गाडय़ांची सुविधा आहे. ठाण्यातील बाळकुम, माजीवाडा, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, मुलूंड चेक नाका, लोकमान्य नगर आणि ठाणे पूर्व येथे बेस्ट बसचे थांबे आहेत. रेल्वेतील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी अनेकजण बेस्ट बसने मुंबईला जातात. त्यात नोकरदारांची संख्या मोठी आहे. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांनी मंगळवारी बंद पुकारल्यामुळे बेस्टच्या बसगाडय़ा आगाराबाहेर पडल्या नाहीत. विविध मागण्या मान्य होत नसल्यामुळे सुमारे ३० हजार ५०० कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून संपावर गेले असून या बंदमुळे मंगळवारी सकाळी ठाण्याहून मुंबईला कामासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.

सकाळी काही काळ रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली होती. मात्र, बेस्ट संपाच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष उपनगरीय रेल्वे गाडय़ा सोडल्या होत्या. दुपारी १.४४ वाजता ठाण्याहून मुंबईच्या दिशेने तर २.४९ वाजता मुंबईहून कल्याणच्या दिशेने विशेष लोकल सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.