राज्यातील आठ जिल्ह्यांतील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) पुरवणाऱ्या ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाण्यातील नागरिकांचे अर्ज मुंबईतील पारपत्र कार्यालयातही स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मालाड येथील पारपत्र कार्यालयात ठाणेकरांसाठी पाच स्वतंत्र खिडक्यांची सोय करण्यात आली असल्याची माहिती ठाणे पारपत्र कार्यालयाचे अधिकारी टी. डी. शर्मा यांनी दिली.
ठाण्यातील वागळे परिसरामध्ये पारपत्र सेवा केंद्र असून तेथे  ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यातील नागरिकांचे पारपत्र अर्ज स्वीकारण्यात येतात. दिवसाला बाराशेहून अधिक अर्ज येथे स्वीकारले जातात. एकाच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने ठाण्यातील नागरिकांना या केंद्रावर मोठी गर्दी करावी लागत होती. वसई-विरार या भागातील नागरिकांनासुद्धा मोठा हेलपाटा घातालावा लागतो. अनेक वेळा मुंबईमध्ये कामासाठी असलेल्या नागरिकांना पारपत्रासाठी सुट्टी घेऊन ठाण्यातील कार्यालय गाठावे लागत होते. ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील मालाड पूर्वमधील टिप्को प्लाझा येथील कार्यालयात ठाण्यातील अर्जदारांसाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यास मुलाखतीसाठी मालाड येथील कार्यालयातही जाता येईल,  असे शर्मा यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी  २५८३२८१८ येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.