पोर्तुगीजांनी बांधलेला ठाणे किल्ला ही आताही ठाण्याची एक ठळक ओळख आहे. ठाण्याच्या वेशीवर खाडीकिनारी असलेल्या या किल्ल्याचा सध्या कारागृह म्हणून वापर होत असल्याने सर्वसामान्यांना तो आतून पाहता येत नाही. मात्र हा किल्ला अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला आहे. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली याच किल्ल्याच्या साक्षीने मराठय़ांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ठाणे जिंकले. ठाणे किल्ल्याचे पूर्वीचे दर्शन घडविणारे एक चित्र आणि दुसरे छायाचित्र उपलब्ध आहे. ए वेंडर हेन् या पाश्चात्त्य चित्रकाराने १७६२ मध्ये सध्याच्या कळवाच्या दिशेने दिसणारे ठाणे किल्ल्याचे दृश्य कॅनव्हासवर रेखाटले आहे. दुसरे छायाचित्र ‘बॉम्बे द सिटीज् विदीन’ या शारदा द्विवेदी आणि राहुल मल्होत्रा यांच्या पुस्तकातील आहे. किल्ल्याचा अपवाद वगळता या परिसर बदलला आहे. किल्ले इतिहासाचे साक्षीदार असतात असे म्हणतात, ते यासाठीच..     
(संग्राहक- सदाशिव टेटविलकर)  
tv10
काय, कुठे, कसं?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
*शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीतील विद्यार्थिनींचे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ सुरू केली आहे.
*या योजनेंतर्गत ८ वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींना प्रत्येक शैक्षणिक वर्षांत जून ते मार्च असे १० महिने दरमहा १०० रुपये अशी शिष्यवृत्ती मिळते.
*या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींना होत आहे. मुलींचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
*या योजनेचा लाभ घेताना मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट नाही; परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे.
*उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते.
*या योजनेसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. दर तीन महिन्यांनी म्हणजे जून, सप्टेंबर व जानेव्ांारी या महिन्यांत शिष्यवृत्ती दिली जाते.
*ही योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.