विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करत शहराच्या विकासासोबतच समाजासाठी योगदान देणाऱ्या ठाणेकरांना महापालिकेने वर्धापन दिनानिमित्ताने ठाणेभूषण, ठाणेगौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्कार देऊन गौरविले. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या वर्षीच्या रखडलेल्या पुरस्काराचेही या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. त्यामुळे यंदा ठाण्यातील १६ जणांना ठाणेभूषण, ४० जणांना ठाणेगौरव आणि ११५ जणांना ठाणे-गुणीजन पुरस्कार देण्यात आले. या जाहीर सत्कार सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पुरस्कार वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचे आयोजन केले होते. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रांत मोलाची कामिगिरी करत ठाणे शहराचा नावलौकिक वाढविण्याचे तसेच शहराच्या विकासासोबतच समाजासाठी योगदान देण्याचे काम करणाऱ्या ठाणेकरांचा महापालिकेच्या वतीने दर वर्षी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने महापालिकेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी ठाणेकरांना ठाणेभूषण, ठाणेगौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्काराने गौरविण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा महापालिकेने गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अशा दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण केले. त्यानुसार, ठाण्यातील १६ जणांना ठाणेभूषण, ४० जणांना ठाणेगौरव आणि ११५ जणांना ठाणे-गुणीजन पुरस्कार देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर ‘रुतबा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणेभूषण पुरस्काराचे मानकरी..

डॉ. वि. जोशी आणि डॉ. स्मिता जोशी, कृष्णकुमार कोळी, वसंत नारायण मराठे, मोहन शंकर गंधे, वसंत शांताराम मोरे, अ‍ॅड्. सदानंद भास्कर भिसे, अनिल पंढरीनाथ कुलकर्णी, लक्ष्मण नरसिंह मुर्डेश्वर, व्ही. के. वानखेडे, सुरेन्द्र दिघे, अ‍ॅड्. बाबा चिटणीस, बर्नेडेट पिमेंटा, अ‍ॅड्. राम आपटे, रवी पटवर्धन, नारायण तांबे आणि मनोहर गणपत सांळुखे आदींना ठाणेभूषण पुरस्कार देण्यात आला.