ठाणे, कल्याण या शहरांसह शहापूरमधील ग्रामीण भागालाही पसंती

विवाहपूर्व छायाचित्रण म्हणजेच प्री-वेडिंग करण्याचा ट्रेंड सध्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागला असून या चित्रीकरणासाठी भावी वधुवरांसह छायाचित्रकार ठाणे जिल्ह्य़ाला मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. प्री-वेडिंगच्या चित्रीकरणासाठी जिल्ह्य़ातील ठाणे शहर, कल्याण, बदलापूर आणि मुरबाड या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असून राज्याच्या विविध भागांतून जोडपी आणि छायाचित्रकारांचा मोठा राबता या भागात पाहायला मिळत आहे.

विवाहासारख्या महत्त्वाच्या क्षणाला आठवणीत साठवून ठेवण्यासाठी पूर्वी लग्नसमारंभात छायाचित्रे काढून त्याचे अल्बम तयार करण्यात येत असत. हे अल्बम अनेक वर्षे घरात जपून ठेवण्यात येत. गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणात बदल झाला असून                अत्याधुनिक कॅमेरे बाजारात आले आहेत. तसेच हे कॅमेरे सहज उपलब्ध झाल्याने लग्नसमारंभाच्या छायाचित्रणाच्या पद्घतीतही मोठे बदल झाले आहेत. पूर्वी समारंभाच्या दिवशी मर्यादित काढली जाणारी छायाचित्रे आता प्री-वेडिंग (लग्नापूर्वी), वेडिंग (लग्नाच्या दिवशी) आणि पोस्ट-वेडिंग (लग्नानंतर) अशा तीन टप्प्यांत काढली जात आहेत. यापैकी प्री-वेडिंग हा प्रकार तरुणतरुणींमध्ये भलताच लोकप्रिय होऊ लागला आहे. प्री-वेडिंगच्या चित्रीकरणासाठी मुंबई-ठाण्यातील भावी वधुवरांसह छायाचित्रकार ठाणे जिल्ह्य़ाला पसंती देत आहेत.

प्री-वेडिंग कसे करतात?

लग्नाच्या काही दिवस अगोदर भावी वधुवर हे एखाद्या ठिकाणी जाऊन चित्रपटातील गाण्यांसारखे एखाद्या छोटय़ा कथेवरच्या आधारे दोघांचे चित्रीकरण करून घेतात. हे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर एखादे गाणे टाकून त्याचे संकलन केले जाते. या सर्वाची नंतर एक छोटीशी चित्रफीत तयार करण्यात येते. चित्रीकरणासाठी अत्याधुनिक  कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे वापरण्यात येतात. प्री-वेडिंगसाठी छायाचित्रकारांकडून ६ हजार रुपये प्रति दिवस ते ३५ हजार रुपये प्रति दिवस असे दर आकारले जातात.

भावी वधुवरांची पारंपरिक पोशाखांना पसंती

प्री-वेडिंग चित्रीकरणासाठी भावी वधुवर हे पारंपरिक नऊवारी साडी, धोतर-कुर्ता अशा पोशाखांना प्राधान्य देतात. तसेच कथेवर आधारित पारंपरिक पोशाख खरेदी केले जात आहेत. एका प्री-वेडिंगसाठी दोन ते तीन पोशाख बदलले जात असून हे पोशाख भाडय़ाने देत असल्याचे निखिल जाधव या छायाचित्रकारांकडून सांगण्यात येत आहे.

प्री-वेडिंग चित्रीकरणाला सध्या मोठय़ा प्रमाणात मागणी असून भावी वधुवरांकडून चित्रीकरणासाठी ठाणे जिल्ह्य़ाची निवड करण्यात येत आहे. तसेच ठाणे जिल्ह्य़ात विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी उत्तम ठिकाणे असून मुंबईवरून ठाणे जिल्हा जवळ असल्याने एका दिवसात चित्रीकरण पूर्ण होते. – भूषण बोधारे, छायाचित्रकार, फ्यूजन फोटोग्राफी