तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्याने कारवाई

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर एका रिक्षामध्ये दोन प्रवाशांना प्रवासाची परवानगी असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील शेअर रिक्षाचालक तीनहून अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहेत. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली असून सोमवारी एकाच दिवसात वाहतूक पोलिसांनी १ हजार ५९ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. सर्वाधिक कारवाई ही कल्याण, मुंब्रा आणि कळवा या उपविभागातर्फे करण्यात आली.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिक्षांमधून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी अनेक शहरांमध्ये काही बेशिस्त रिक्षाचालक एका रिक्षातून तीनहून अधिक प्रवाशांची वाहतूक करत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे. रिक्षाचालकांकडून सुरू असलेल्या या बेशिस्त प्रकारामुळे जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये आटोक्यात आलेला करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराचे गांर्भीय ओळखून ठाणे वाहतूक शाखेने अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी एकाच दिवसात वाहतूक पोलिसांनी १ हजार ५९ रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. या रिक्षाचालकांना प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे दंड ठोठावण्यात आला आहे.

उपविभागानुसार कारवाई

उपविभाग       कारवाई

ठाणे नगर          ६५

कोपरी                ५०

नौपाडा                २०

वागळे                ३९

कापूरबावडी       ५७

कासारवडवली    ४२

राबोडी                ३५

कळवा               १०६

मुंब्रा                  १०७

भिवंडी              ७६

नारपोली          ५३

कोनगाव           २५

कल्याण            १८०

डोंबिवली            ५७

कोळसेवाडी        ७९

विठ्ठलवाडी          ३०

उल्हासनगर        २७

अंबरनाथ            ११

करोनाकाळात एका रिक्षामधून तीनहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच राहणार आहे.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.