जास्तीत जास्त मोबदल्यासाठी कंत्राटदारांकडून बेबंद कारवाई

नीलेश पानमंद / ऋषीकेश मुळे, ठाणे</strong>

ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ नसल्यामुळे ठाणेकर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करतात. मात्र वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे कारण देत, वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. दोन चारचाकींच्या मधोमध दुचाकी उभी केली असेल, तर चारचाकींकडे दुर्लक्ष करून केवळ दुचाकीच उचलून नेली जाते आणि वाहतुकीस अडथळा ठरत असल्यामुळे कारवाई केल्याचे कारण दिले जाते. एका दुचाकीमागे क्रेन मालकास १०० रुपये दिले जात असल्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त दुचाकींवर कारवाई करण्याची धडपड कर्मचारी करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठाणे, कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, मुंब्रा या भागांतील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक शाखेच्या क्रेनचा दिवसभर राबता असतो. रस्त्यावर दुचाकी उचलण्यासाठी क्रेनवरील कर्मचारी चालत्या वाहनातून उतरून धावत सुटतात. त्यांची स्पर्धाच लागते. दुचाकी उचलताना तिचे नुकसान होऊ नये याची काळजी    घेतली जात नाही. दुचाकी उचलण्याआधी त्याची उद्घोषणा करण्यात यावी आणि क्रेनवर सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, असे नियम काही वर्षांपूर्वी लागू करण्यात आले होते. मात्र शहरात हे नियम पाळले जात नाहीत. वाहतूक पोलीसच नियमांची पायमल्ली करताना दिसतात. ज्या रस्त्यांवर वाहनांची फारशी वर्दळ नसते त्या रस्त्यांवरही वाहतूक शाखेच्या क्रेन फिरतात आणि तेथील दुचाकी उचलतात. शहरातील रस्ते गिळंकृत करणाऱ्या गॅरेज चालकांवर, मात्र पोलिसांकडून फारशी कारवाई होताना दिसत नाही.

वर्षभरातील कारवाई

ठाणे ते बदलापूपर्यंतच्या दुचाकी उचलण्यासाठी वाहतूक शाखेकडे ३३ क्रेन आहेत. या क्रेनच्या साहाय्याने गेल्या वर्षभरात ६३ हजार ३९ दुचाकींवर कारवाई करण्यात आली. १ कोटी २५ लाख ८६ हजार ४५० इतका दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे १० हजार ४१२ चारचाकी वाहनांवर जॅमरद्वारे कारवाई करण्यात आली. या चालकांकडून २८ लाख ४० हजार ३५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

दुचाकी उचलून नेण्यात आली की दुचाकीस्वाराकडून तीनशे रुपये दंड घेतला जातो. त्यापैकी दोनशे रुपये शासनाकडे जमा केले जातात, तर उर्वरित शंभर रुपये क्रेनमालकाला दिले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त दुचाकी उचलण्याचा प्रयत्न सुरू असतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नियम पायदळी तुडवून पाचपेक्षा अधिक दुचाकी क्रेनमध्ये ठेवल्या जातात. त्याचा काही भाग क्रेनच्या बाहेर येत असल्यामुळे अपघात होऊ शकतात.

दुचाकीची शोधाशोध

नागरिक अनेकदा रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून कामाच्या ठिकाणी निघून जातात. या दुचाकी वाहतूक पोलीस उचलून नेतात; परंतु वाहन कुठे नेले आहे, याची खडूने नोंदही करत नाहीत. त्यामुळे कामावरून परतल्यावर नागरिकांना दुचाकीचा शोध घेण्यासाठी वाहतूक शाखेचे कार्यालय गाठावे लागते आणि नंतर दुचाकी नेलेल्या स्थळी जावे लागते. काही प्रश्न विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कारवाईनंतर दुचाकी शोधून ती सोडवून आणेपर्यंत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

कारच्या तुलनेने दुचाकींवर कारवाई करणे सोपे असते आणि या कारवाईतून प्रत्येक दुचाकीमागे क्रेनमालकासही पैसे मिळतात. कारचे नुकसान झाले तर ते भरून देणे क्रेनमालकास परवडणारे नसते. त्यामुळेच कारवरील कारवाई टाळून ती दुचाकींवर केली जाते. दुचाकी वापरणारे सर्वसामान्य असल्यामुळे दुजाभाव केला जातो.

– नैनेश पाटणकर, रहिवासी

बेकायदा पार्किंगमुळे शहरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी उचलणे गरजेचे आहे. दिवासाला किती दुचाकी उचलाव्यात याची नियमावली नाही. चारचाकी ठेवण्यासाठी जागा नाही. तसेच दोन चारचाकींमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर कारवाई करू नये, असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस विभाग