ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी आल्याचा दावा केल्याने शहरात खळबळ उडाली होती. ‘ठाण्यात तुम्ही खूप भांडण करत असून, नीट न वागल्यास उचलून नेऊ’, अशी धमकी फोनवरुन देण्यात आलाचा दावा शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. याप्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांनाच धमकीचा फोन आल्याने ही धमकी दिल्या प्रकरणी एका व्यक्तीला मुंब्र्यामधून अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी ठाण्यामध्ये युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली होती. यावेळी आदित्य ठाकरेंबरोबर ठाण्यातील सेनेचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. यामध्ये महापौर शिंदे यांचाही समावेश होता. ‘मंगळवारी रात्री घरी गेल्यानंतर मला मोबाइल फोनवर त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने, ‘मी डोंगरीतून दाऊदचा माणूस बोलतोय, छोटा शकीलला ओळखता का? तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता. तुम्ही नीट न राहिल्यास तुम्हाला उचलून नेऊ. तुमच्या कुटुंबालाही त्रास देऊ,’ अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचे महापौरांनी म्हटले होते. प्राथमिक तपासामध्ये ज्या क्रमांकावरुन महापौरांना हा धमकीचा फोन आला तो एका महिलेच्या नावावर नोंदणी करण्यात आलेला क्रमांक असल्याचे समजले. मात्र ही महिला मागील बऱ्याच काळापासून हा क्रमांक वापरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा सखोल तपास केला. अखेर या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने काल (गुरुवारी) मुंब्र्यातील वासिम सादिक मुल्ला या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र ही व्यक्ती दाऊद किंवा छोटा शकीलशी काही संबंध आहे का याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ठाण्यामधील खंडणी विरोधी पथकाने मागील काही काळापासून अनेक प्रकरणांमध्ये धडक कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर थेट महापौरांना दाऊदच्या नावाने धमकी दिल्याचे बोलले जात आहे.