05 June 2020

News Flash

ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहा

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाच, आता काही भामटय़ांनी करोनाच्या नावाने नागरिकांची ऑनलाइनद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. मात्र या भामटय़ांच्या जाळ्यात कोणीही अडकू नये म्हणून ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाच्या लढय़ासाठी आर्थिक देणगी, भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार कर्जदारांचे मासिक हप्ते तीन महिने स्थगित करणे, अशा आशयाचे खोटे संदेश आणि संकेतस्थळाच्या लिंक पाठविल्या जात असून अशा संदेशांना भुलून जाऊ नका, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

देशासह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे कामधंदा बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून यामुळेच कर्मचाऱ्यांना पुढच्या काही महिन्यांत पगार मिळेल की नाही, याची चिंता सतावू लागली आहे. तसेच अनेकांनी गृह, वाहन, वैयक्तिक तसेच इतर कर्ज घेतले असून त्याचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न आहे.

कर्जाचे मासिक हप्ते तीन महिने वसूल करू नये असा आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी, गृह आणि वित्त बँकांना दिले आहेत. तसेच करोनाविरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. मात्र काही भामटय़ांनी आता या आवाहनाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. देश-विदेशातील भामटय़ांच्या टोळ्या सिक्रय झाल्या असून या टोळ्या फसवणूक करण्यासाठी नागरिकांच्या मोबाइलवर खोटे संदेश पाठवू लागले आहेत. तर काही भामटे नागरिकांना मोबाइलवर संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. करोनाच्या लढय़ासाठी आर्थिक देणगी, भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार कर्जदारांचे मासिक हप्ते तीन महिने स्थगित करणे, अशा आशयाचे खोटे संदेश आणि संकेतस्थळाच्या लिंक पाठविल्या जात आहेत. या संदेशातील लिंकवर नागरिकांनी बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांची माहिती टोळीला मिळू शकते. त्याआधारे हे भामटे संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेऊन आर्थिक फसवणूक करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारचे संदेश आले तर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच करोनाविरोधात लढण्यासाठी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळांप्रमाणेच हुबेहूब संकेतस्थळे तयार केली जात आहेत.  त्यामध्ये मात्र अक्षरांचा काहीसा फरक असतो. त्यामुळे करोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या खात्यात आर्थिक मदत करायची असेल तर आधी खात्री करून घ्यावी किंवा सायबर पोलिसांनी ट्विटर खात्यावर दिलेल्या माहितीवर जाऊन पडताळणी करूनच मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अशी होत आहे फसवणूक

कर्जाचे मासिक हप्ते वसूल करू नये असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. मात्र त्याचाच फायदा घेऊन भामटे नागरिकांची फसवणूक करण्यासाठी खोटे संदेश पाठवीत आहेत. मासिक हप्ते स्थगित करण्याच्या नावाखाली नागरिकांच्या मोबाइलवर संदेश पाठविले जात असून त्यामध्ये संकेतस्थळाच्या लिंक देण्यात येतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर फसवणूक होऊ शकते. तर काही नागरिकांना संपर्क साधून मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर मागवून फसवणूक केली जात आहे. आर्थिक साहाय्याच्या नावाखाली खोटय़ा लिंक तयार केल्या गेल्या आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. तर जागतिक आरोग्य संघटनेनेही नागरिकांना आर्थिक साहाय्य करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:51 am

Web Title: thane police appeal citizens to alert of online fraud in the name of coronavirus zws 70
Next Stories
1 टाळेबंदीतील उल्लंघनामुळे भाजीपाला बांधावरच
2 जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या
3 coronavirus : वसईच्या करोनाबाधीत रुग्णांची संख्या २९
Just Now!
X