ठाणे येथील खंडणीप्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, मुमताज, इसरार अली या आरोपींसह दाऊदचा हस्तक छोटा शकील याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या पाच जणांवर मोक्का लावण्यास परवानगी दिली.


ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एका अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर या अधिकाऱ्याने या प्रकरणाचे पूर्ण अवलोकन केल्यानंतर मोक्का लावण्यास परवानगी दिली.

मोक्कासारखा कडक गुन्हा दाखल करण्यात आल्याने ‘डी’ कंपनीच्या छोटा शकील, इक्बाल कासकरसमोरील अडचणी वाढणार आहेत. यामुळे त्यांना सहजासहजी जामिनही मिळू शकणार नाही. या खंडणी प्रकरणात अंडरवर्ल्डच्या नावे धमकी देण्यात आल्याने हा गुन्हा संघटीत गुन्हेगारीच्या प्रकारात मोडत असल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण मोक्का अंतर्गत चालवले जाणार आहे.

ठाणे पोलिसांनी महिनाभरापूर्वी इक्बाल कासकर याला या खंडणीप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवसांत या प्रकरणात दाऊदचा हस्तक असलेल्या छोटा शकीलचाही हात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.